नंदुरबार - कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रातील दुकाने सुरू करणार्या 37 जणांविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी आदेशित केल्याप्रमाणे सदर परिसर प्रतिबंधित करण्यात आला होता.
नंदुरबारमध्ये प्रतिबंधित क्षेत्रात दुकाने सुरू; दुकानदारांसह 37 जणांविरुध्द गुन्हा दाखल
शहरात कोरोनाबाधित महिला आढळून आल्यानंतर शहरातील काही परिसर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने प्रतिबंधित करण्यात आले होते. मात्र, या क्षेत्रात दुकाने सुरू करण्यास प्रतिबंध असतांनाही काही दुकानदारांनी दुकाने उघडली. याप्रकरणी, 37 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात कोरोनाबाधित महिला आढळून आल्यानंतर शहरातील काही परिसर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्या आदेशाने प्रतिबंधित करण्यात आले होते. शहरातील अहिल्याबाई विहीर परिसरात आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत अहिल्याबाई विहीरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जारी करण्यात आला आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात दुकाने सुरू करण्यास प्रतिबंध असतांनाही काही दुकानदारांनी दुकाने सुरू केली. यामुळे जिल्हाधिकारी व पोलीस महासंचालकांनी जारी केलेल्या विविध प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाले.
याबाबत दिलीप कर्मा वसावे, संपत भिला कोळी यांनी वेगवेगळ्या पाच तक्रारी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिल्या आहेत. त्यानुसार विनोदकुमार जंदरमल मंदाणा, विक्रम बजाज, सतिष माळी, गोपाल बागले, हर्षल परदेशी, अनिल वासवाणी, शंकर मंदाणा, अशोक जैन, राम गुरुबक्षाणी व त्यांच्या सोबतचे दुकानाचे शटर लावून पळालेले चार व्यक्ती, बालाजी साडी, जगदंबा कलेक्शन, मोदी हॅन्डलुम, अंबर मॅचिंग, अरिहंत कलेक्शन, सिध्दार्थ कलेक्शन या दुकानातील प्रत्येकी चारजण अशा एकूण 37 जणांविरुध्द भादंवि कलम 188, 268, 269, 290 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.