नंदुरबार - धुळे-सुरत महामार्गावर एका सक्झरी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. औरंगाबादहून अहमदाबादकडे जाणाऱ्या लक्झरी बसने पहाटे अचानक पेट घेतला. या लक्झरीमध्ये 40 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. ही बस एम के ट्रॅव्हल्सची आहे.
धुळे-सुरत महामार्गावर सोनखांब गावाजवळ लक्झरी बसला आग; चालकाच्या प्रसंगावधाने 40 प्रवाशी वाचले - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 बस आग बातमी
धुळे-सुरत महामार्गावरील विसरवाडीपासून ८ किलोमीटर अंतरावर सोनखांब गावाजवळ लक्झरी बसच्या लायनरच्या घर्षणामुळे चाकाने अचानक पेट घेतला. मात्र आगीचे स्वरुप अतिशय तीव्र असल्याने काही क्षणात बसने पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे ४० प्रवाशांचे प्राण वाचले.
आगीचे रौद्ररूप, प्रवासी वाचले
धुळे-सुरत महामार्गावरील विसरवाडीपासून ८ किलोमीटर अंतरावर सोनखांब गावाजवळील शिवार शेरेटन हॉटेल ही घटना घडली. नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाट उतरून सोनखांब शिवारातून जात असताना लक्झरी बसच्या लायनरच्या घर्षणामुळे चाकाने अचानक पेट घेतला. बसला आग लागल्याचे चालकाला कळताच त्याने प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना बसमधून उतरवले. सुदैवाने जीवितहानी टळली. चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. मात्र आगीचे स्वरुप अतिशय तीव्र असल्याने काही क्षणात बसने पेट घेतला. आगीने रौद्ररूप धारण केले. काही वेळातच लक्झरी बस जळून खाक झाली.
मृत्युचा सापळा
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर वारंवार होत असलेल्या वाहन अपघातांच्या घटनेमुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. गेल्या काही दिवसात दहा ते पंधरा जणांना याच रस्त्यावर आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या महिन्यात लक्झरी बस पुलावरून कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला होता. याच ठिकाणी स्विफ्ट डिझायर कार पडल्याने तीन जण जागीच ठार झाले होते तर दोघे गंभीर जखमी झाले. याच रस्त्यावर जळगाव येथील उद्योगपती कार अपघातात जागीच ठार झाला होता.