नंदुरबार :नवापूर-पिंपळनेर रस्त्यावरील चरणमाळ घाटात सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास बसवरील नियंत्रण सुटल्याने बस सुरक्षा भिंतीला आदळली. यात चार बालकांसह 16 प्रवासी जखमी झाले आहेत. तर सहचालकाचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले असून बस चालकाने घटनास्थळहून रात्रीच पळ काढल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा-चिकन खाणे सुरक्षित, कोरोनाचा संसर्ग होत नाही- केंद्र सरकार
गुजरात राज्यातील सूरत येथील गरीबरथ खाजगी बस (जी.जे 14 एक्स 2250) धुळ्याहून लग्नकार्यकरुन सूरतला जात होती. दरम्यान, चरणमाळ घाटातील वळणावर बसचालकाचे नियंत्रण सुटले. बस रस्त्यावरील संरक्षण कठड्याला आदळली. बसमध्ये 30 ते 35 प्रवासी होते. यातील 16 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सूरत येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व प्रवाशी सुरत येथील उन पाट्याचे रहिवासी आहेत. सहचालक शाहिद नजरी शाह (वय 24 रा. उन पाटिया सूरत गुजरात) याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, बसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बस चालक दारुच्या नशेत मोठ्या आवाजाने संगीत ऐकून बस चालवत होता. अनेक वेळा बसमधील प्रवाशांनी वाहनचालकाला बस सावकाश चालवण्याची ताकीद दिली. परंतु, बस चालकाने कोणाचेही न ऐकता बस त्याच्या पद्धतीने चालवत राहिला.