नंदुरबार- जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या निवडीत दोन समितींवर सभापतींची बिनविरोध तर दोन समितींच्या निवडणुकीतून सभापतींची निवड झाली. यात समाज कल्याण समिती सभापतिपदी काँग्रेसचे रतन खात्र्या पाडवी व महिला बालकल्याण समिती सभापतिपदी काँग्रेसच्या निर्मला सिताराम राऊत यांची बिनविरोध निवड झाली. तसेच काँग्रेसचे अभिजीत पाटील व भाजपाच्या जयश्री पाटील यांची विषय समितीसाठी निवडणुकीने निवड झाली आहे.
नवनियुक्त सभापतींना विभागांचे वाटप झालेले नाही. म्हणून त्यांना जि.प.अध्यक्षा अॅड. सिमा वळवी या कोणत्या समितीची जबाबदारी सोपवतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभापती निवडीत काँग्रेसचे ३ व भाजपच्या एका सदस्यांची निवड झाली. सत्तेसाठी हात मिळवणी करणार्या काँग्रेसने भाजपशी हातमिळवणी करून जिल्हा परिषदेत ३ सभापतीपद मिळविले. तर एक सभापतीपद भाजपने काबीज केले.
जिल्हा परिषदेत ३ पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे सारे राजकीय नाट्य रंगले. सभापती निवडीसाठी गाफील राहिलेल्या शिवसेनेला अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जावे लागले. जिल्हा परिषदेच्या इतिहासात असे पहिल्यांदाच राजकीय नाट्य रंगले असून आता जिल्हा परिषदेत काँग्रेस, शिवसेना व भाजप अशा तिन्ही पक्षांची सत्ता स्थापन झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ४ विषय समितींच्या सभापती निवडीची प्रक्रिया काल झाली. जि.प.च्या याहामोगी सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुड यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया घेण्यात आली. याप्रसंगी जि.प.अध्यक्षा अॅड. सिमा वळवी, उपाध्यक्ष अॅड. राम रघुवंशी आदी उपस्थित होते. यात समाजकल्याण समिती सभापतीसाठी काँग्रेसतर्फे रतन खात्र्या पाडवी, सुरेश सुरुपसिंग गावीत आणि महिला बालकल्याण समितीसाठी काँग्रेसतर्फे निर्मलाबाई सिताराम राऊत व भाजपतर्फे अर्चना शरद गावीत, रुचिका प्रविण पाटील. दोन विषय समितींसाठी भाजपतर्फे जयश्री दिपक पाटील, संगिता प्रकाश वळवी, काँग्रेसतर्फे अजित सुरुपसिंग नाईक, अभिजीत मोतीलाल पाटील व शिवसेनेतर्फे गणेश रुपसिंग पराडके, शंकर आमश्या पाडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने छाननीअंती सर्वांचे अर्ज वैध ठरले. परंतु, माघारीअंती समाजकल्याण सभापतीसाठी दाखल असलेल्या नामांकनापैकी सुरेश सुरुपसिंग गावीत यांनी अर्ज मागे घेतल्याने सभापतीपदी काँग्रेसचे रतन खात्र्या पाडवी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
तर, महिला बालकल्याण समितीसाठी दाखल नामांकनांपैकी भाजपच्या अर्चना शरद गावीत, रुचिका प्रविण पाटील यांनी माघार घेतल्याने महिला बालकल्याण सभापतीपदी काँग्रेसच्या निर्मला सिताराम राऊत यांची बिनविरोध निवड झाली. तसेच दोन विषय समितींसाठी दाखल अर्जांपैकी संगिता प्रकाश वळवी, शंकर आमश्या पाडवी या दोघांनी माघार घेतली. त्यामुळे, दोन्ही समितींसाठी प्रत्येकी दोन उमेदवार राहिल्याने त्यांच्यात निवडणूक झाली.
यावेळी दोन समितींच्या सभापतिपदाकरता निवडणूक घेण्यात आल्याने सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. यात काँग्रेसचे अभिजीत पाटील व काँग्रेसचे अजित नाईक या एकाच पक्षातील सदस्यांमध्ये आमने-सामने निवडणूक झाल्याने अभिजीत पाटील यांना ४४ मते तर अजित नाईक यांना केवळ ५ मते मिळाली. त्यामुळे, अभिजीत मोतीलाल पाटील यांची निवड झाली आहे. तसेच भाजपच्या जयश्री दीपक पाटील यांना ४२ मते तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे गणेश रुपसिंग पराडके यांना ११ मते मिळाली. त्यामुळे, भाजपच्या जयश्री दीपक पाटील यांची सभापती म्हणून निवड झाली.