महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने पूर्वतयारी करा; पालकमंत्र्यांचे निर्देश - k c padvi instructions nandurbar

जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत गैरसमज पसरविण्यात आले आहेत. यासाठी ग्रामीण भागात नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनानेही आवाहन करावे व नागरिकांमध्ये जनजागृती करावी.

k c padvi
के. सी. पाडवी

By

Published : May 22, 2021, 8:45 PM IST

Updated : May 22, 2021, 10:09 PM IST

नंदुरबार - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने आवश्यक पूर्वतयारी करावी आणि मृत्युदर कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकासमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री पाडवी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक

आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी दिल्या सूचना -

यावेळी मंत्री पाडवी म्हणाले, लहान मुलांवर उपचार करण्यासाठी आवश्यक सुविधा आतापासून निर्माण करा. म्यूकरमायकोसिसच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करा. ग्रामीण भागातील लसीकरणाला गती देण्यात यावी. अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी. बाजाराच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. दुर्गम भागात संसर्ग वाढणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करावी. बँकेच्या बाहेर मंडपाची व्यवस्था करून शारीरिक अंतराचे पालन होईल याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. खावटी अनुदान योजनेतील निधी वितरणाबाबत दैनंदिन आढावा घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

लसीकरणाबाबत ग्रामीण भागात जनजागृती करा -

जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत गैरसमज पसरविण्यात आले आहेत. यासाठी ग्रामीण भागात नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनानेही आवाहन करावे व नागरिकांमध्ये जनजागृती करावी. लसीकरणासाठी प्रशासनातर्फे ग्रामीण भागात शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहेत. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे, असेदेखील त्यांनी सांगितले.

हेही वाचा -कायद्यात वेळ निश्चित नसल्याचा फायदा राज्यपालांनी घेतला - नवाब मलिक

पावसाळ्यापूर्वी मनरेगाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना द्या -

कोरोना संसर्ग कमी होत असतांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना द्यावी, असे निर्देश पाडवी यांनी दिले. तसेच बाहेरील राज्यातून परतलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावे. गाळ काढण्याची कामे, फळबाग, वृक्षारोपण अशी कामे घेण्यात यावी. शेतीची कामे सुरू होईपर्यंत ग्रामीण भागात अधिक कामे सुरू करून रोजगार निर्माण करण्याचे प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा -

वादळामुळे धडगाव आणि अक्कलकुवा भागात झालेल्या आंब्याच्या नुकसानीचा आढावा घ्यावा. खरीप हंगामात शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी बी-बियाणांची अवैध विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. खतांची वेळेवर उपलब्धता होईल, याची दक्षता घ्यावी. पीक कर्ज वाटपाच्या कामाला गती देण्यात यावी. अक्कलकुवा तालुक्यात ठिबक सिंचन अनुदानाबाबत असलेल्या तक्रारीविषयी बँक आणि कृषि विभागाने चौकशी करावी. घरकुल योजनेबाबत तक्रारींची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी. शबरी घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी उद्दिष्ट वाढवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला खासदार डॉ. हिना गावीत, शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी, नवापूर मतदार संघाचे आमदार शिरीष नाईक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.

हेही वाचा -कोरोनामुळे जगभरात एका वर्षात 30 लाख लोकांचा मृत्यू; WHO चा अहवाल

Last Updated : May 22, 2021, 10:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details