नंदुरबार(शहादा) -तालुक्यातील होळगुजरी ग्रामपंचायती अंतर्गत गावात बांधकाम केलेल्या मुतारी व पाण्याच्या हौदाचे बिल मंजुर करण्यासाठी लाच मागणाऱ्या अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले. बिल मंजुरीची सही करण्यासाठी शहादा पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंत्याने 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शहादा पंचायत समितीमध्ये ही कारवाई केली.
शहादा तालुक्याच्या टेंभली येथील होळगुजरी गट ग्रामपंचायतीमार्फत गावात पेसा(अनुसुचित भागांचा विकास)अंतर्गत मुतारी आणि पाण्याच्या हौदाचे बांधकाम ठेकेदाराने केली. या दोन्ही कामांचे 6 लाख 43 हजार इतके बिल झाले आहे. यातील 1 लाख रुपये शासनाकडून अगोदरच मिळाले आहेत. उर्वरित 5 लाख 43 हजार रुपये काम झाल्यानंतर मिळणार होते. सदरची कामे पूर्ण झाल्यानंतर बिल मंजुरीसाठी फाईलवर शहादा पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता ईश्वर सखाराम पटेल याची सही आवश्यक होती. सही करण्यासाठी सहाय्यक अभियंता पटेल याने ठेकेदाराकडे 10 हजार रुपयांची लाच मागितली.