नंदुरबार- राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मेडीकल ॲसेसमेंट अँड रेटींग बोर्डाने नंदुरबार येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यावर्षी प्रथम वर्षासाठी 100 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. हिना गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली.
100 विद्यार्थ्यांना प्रवेशास परवानगी..
नंदुरबारला 2019 मध्येच मेडिकल कॉलेज मंजूर करण्यात आले होते, मात्र लॉकडाऊनमुळे पुढील प्रक्रिया रखडली होती अशी माहिती खासदार गावित यांनी दिली. आता अनलॉकचे टप्पे सुरू झाल्याने मेडिकल कॉलेजच्या कामाला गती आली आहे. या कॉलेजसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींच्या पाहणीसाठी एक पथक येऊन गेले आहे. त्यांनी मेडिकल कॉलेज 2020-2021 या शैक्षणीक वर्षापासून सुरू करण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यानुसार या वर्षापासून 'नीट' पास झालेल्या विविध राज्यातील 100 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
रुग्णांना बाहेर जाण्याची गरज भासणार नाही..
मेडिकल कॉलेजच्या उभारणीकरता लागणाऱ्या आवश्यक निधीलाही केंद्र व राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात नंदुरबार येथे मेडिकल कॉलेज सुरळीत होईल, असा दावा हिना गावित यांनी केला आहे. मेडिकल कॉलेज सुरू झाल्यास सर्व सुविधा उपलब्ध होणार असून या भागातील रुग्णांना बाहेर जाण्याची गरज भासणार नाही, असे गावित यांनी सांगितले. यावेळी आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी देखील मेडिकल कॉलेजसाठी आपण सुरुवातीपासून पाठपुरावा केल्याची माहिती दिली.
15 टक्के जागा केंद्राच्या कोट्यासाठी वर्ग..
प्रथम वर्षासाठी 100 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. ही परवानगी पहिल्या वर्षासाठी असून बोर्डाच्या पुढील तपासणीनंतर दुसऱ्या बॅचला परवानगी देण्यात येणार आहे. बोर्डाच्या नियमानुसार 15 टक्के जागा केंद्राच्या कोट्यासाठी वर्ग करण्यात आल्या आहेत. उर्वरीत 85 जागांसाठी प्रवेश प्रक्रीया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे हिना गावित यांनी सांगितले.
हेही वाचा-Top 10 @ 9 AM : सकाळी नऊ पर्यंतच्या ठळक बातम्या
हेही वाचा-ऑनलाइन शिक्षणाचे पितळ उघडे ; 23 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन्स नाही!