नंदुरबार - सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन अपयशी ठरत आहे. सातपुड्याच्या पाल्हाबारी गावातील एक गाय दरीत पाण्याच्या शोध घेताना जखमी झाली. यावेळी नागरिकांनी गाईला वाचवण्यासाठी बांबूलन्सचा उपयोग करून तिला जीवदान दिले.
पाणीटंचाईमुळे सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील दुष्काळी भागात नागरिकांना आणि जनावरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सातपुड्याच्या दऱ्या-खोऱ्यातील काही भागात अतिधोकादायक दऱ्यांमध्ये झऱ्याचे पाणी आहे. मात्र, तेथे पोहोचण्यासाठी माणसांना आणि जनावरांना पोहोचणे कठीण आहे. तरीही जनावरे पाण्यासाठी या ठिकाणी जात असतात. त्यामुळे येथे अनेक अपघाताच्या घटना घडत असतात. सातपुड्यातील पाल्हाबारी या गावातील गायही पाण्यासाठी घाटातून रस्ता काढत असताना तिचा पाय घसरला आणि ती जखमी झाली. गावकऱ्यांनी या गाईला वाचवण्यासाठी बांबूलन्स झोळी करून घाटातून वर काढून जीवनदान दिले.
सातपुड्यातील काही गावांमध्ये प्रशासनाद्वारे गाढवाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र, तो पुरेसा नाही तसेच जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन असमर्थ ठरत आहे. त्यामुळे यावर तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.