महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका रेलू वसावे यांचा सत्कार - Nandurbar District Latest News

अक्कलकुवा तालुक्यातील चिमलखेडी येथील अंगणवाडी सेविका रेलू वसावे यांनी कोरोना संकटाच्या काळात स्वत: बोटीने प्रवास करून दुर्गम भागात सेवा दिल्याने, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला. चिमलखेडी अंगणवाडीला चांगल्या सुविधा देणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी सांगितले.

Anganwadi worker felicitated by Collector
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकेचा सत्कार

By

Published : Nov 26, 2020, 6:24 PM IST

नंदुरबार -अक्कलकुवा तालुक्यातील चिमलखेडी येथील अंगणवाडी सेविका रेलू वसावे यांनी कोरोना संकटाच्या काळात स्वत: बोटीने प्रवास करून दुर्गम भागात सेवा दिल्याने, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला. चिमलखेडी अंगणवाडीला चांगल्या सुविधा देणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी सांगितले.

रेलू वसावे यांच्या कार्याचे देशभरात कौतुक होत असताना त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भुपेंद्र बेडसे, कृष्णा राठोड, रेलू वसावे यांचे पती रमेश वसावे, अंगणवाडी मदतनीस सोनीबाई वसावे यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकार्‍यांनी केला सत्कार

जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी साडीचोळी, अभिनंदनपत्र आणि मिठाई देऊन रेलू वसावे यांचा सत्कार केला. त्यांना प्रोत्साहन देणारे पती रमेश वसावे, मदतनीस सोनीबाई यांचाही सत्कार करण्यात आला. त्यांच्या मुलींनादेखील जिल्हाधिकाऱ्यांनी भेटवस्तू दिली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अंगणवाडी सेविकेचा सत्कार

जिल्हाधिकार्‍यांनी केले कौतुक

या प्रसंगी डॉ. राजेंद्र भारुड म्हणाले की, कोरोना संकटाच्या काळातही वसावे यांनी कर्तव्यनिष्ठा कमी होऊ दिली नाही. त्यांनी आपल्या कार्याने राज्य आणि देशासमोर अनोखे उदाहरण ठेवले आहे. त्यांच्या कामगिरीचा गौरव आणि प्रोत्साहन म्हणून चिमलखेडी अंगणवाडीला चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. रेलू वसावे या अंगणवाडीला घराप्रमाणे जपतील आणि त्या परिसरात भविष्यात एकही बालक कुपोषित राहणार नाही याची दक्षता घेतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

रेलू वसावे यांचे कार्य प्रेरणादायी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे म्हणाले की, रेलू वसावे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यातून इतरांना देखील प्रेरणा मिळेल. त्यांच्या कामाचा प्रशासनाला अभिमान आहे.

कार्याची दखल घेतल्याने मनोबल वाढले

जिल्हा प्रशासनाने कौतुक केल्याने प्रोत्साहन मिळाल्याचे रेलू यांनी यावेळी सांगितले. सात पाड्यांवर आहार पोहोचविण्याचे काम प्रामाणिकपणे करत असल्याचे त्या म्हणाल्या. कोरोनाच्या काळातही मी सेवेत कधी खंड पडू दिला नाही. आज माझ्या कार्याची दखल घेतल्याने चांगले वाटत आहे. भविष्यातही असेच काम करत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. माता आणि बालक कोरोनामुळे अंगणवाडी केंद्रात येणे बंद झाल्यावर स्वत: त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा निर्णय रेलू यांनी घेतला. त्यांना पूर्वी अंगणवाडी केंद्रातूनच आहार देण्यात येत असे. रेलू यांना पोहणे आणि बोट चालविणे येते. काहीवेळा एकट्याने आणि काहीवेळा आपल्या नातेवाईक संगिता यांच्यासोबत त्यांनी बोटीने प्रवास केला. रेलू यांना दोन लहान मुली आहेत. असे असताना सकाळी लवकर घरातून बाहेर पडून दुपारी 12 वाजेपर्यंत त्या अंगणवाडी केंद्राचे काम करतात. त्यानंतर त्या बोटीने परिसरातील पाड्यापर्यंत पोहोचतात. एका पाड्यावर आठवड्यातून दोनदा भेट देतात. गेल्या 6 वर्षापासून त्या आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details