नंदुरबार - जिल्ह्यातील अक्कलकूवा व धडगाव हे दोन तालुके अतिदुर्गम आहेत. अतिदुर्गम भागातील नर्मदा नदीकाठावरील जीवन तर अतिशय खडतर आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत रेणू रमेश वसावे या अंगणवाडी सेविका नर्मदा भागात स्वत: मुलांना आहार पोहचवतात. कधी गाडीने, कधी पायवाटेने तर कधी होडीतून प्रवास करून त्या पोषण आहार पुरवतात. शुन्य ते सहा वर्षांच्या बालकांना तसेच स्तनदा माता, गरोदर माता, किशोरवयीन मुलींना विविध आहारांच्या वाटपाचे काम त्या विना तक्रार करत आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासनाने त्यांचा गौरव केला आहे.
रेणू रमेश वसावे या होडीतून प्रवास करून मुलांपर्यंत पोषण आहार पोहचवतात कोविडबाबत केली जनजागृती -
चिमलखेडी परिसरात नर्मदा नदी व डोंगरांचा परिसर आहे. त्यामुळे रेणू डोंगरांतील आणि नर्मदेच्या पलीकडे राहणाऱ्या बालकांच्या घरी जातात. यासाठी त्या स्वत:च्या पैशातून होडी अथवा बोटीने या काठावरून त्या काठावर जातात. याशिवाय गावांतील महिलांच्या बैठका घेऊन सतत जनजागृती देखील करतात. कोवीडची लागण दुर्गम भागात पोहचू नये, यासाठी त्यांनी या नागरिकांपर्यंत कोवीडचे गांभीर्य पोहचवले आहे.
दुर्गम भागात सेवेचा आदर्श -
चिमलखेडी येथील 27 वर्षाच्या रेणू वसावे यांनी आपल्या कार्यातून धैर्य आणि क्षमतेचा परिचय दिला आहे. कोरोना संकटातही मासेमारी बोटीने नर्मदेच्या पात्रातून प्रवास करत त्यांनी परिसरातील गोराडी, वलनी, दाबाड, कामा, अलिघाट, पिरेबारा आणि पाटीलपाडा या 7 पाड्यांवर राहणारी बालके आणि गरोदर मातांपर्यंत पौष्टीक आहार पोहोचवला. बालकांचे वजन तपासणे आणि मातांना आरोग्यासंबंधी माहिती देण्याचे कार्यदेखील त्यांनी सुरूच ठेवले. माता आणि बालक कोरोनामुळे अंगणवाडी केंद्रात येणे बंद झाल्यानंतर स्वत: त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा निर्णय रेणू यांनी घेतला. त्यांना पूर्वी अंगणवाडी केंद्रातूनच आहार देण्यात येत असे. रेणू यांना पोहता आणि बोट चालवता येते. काहीवेळा एकटीने आणि काहीवेळा आपल्या नातेवाईक संगिता यांच्यासमवेत त्यांनी बोटीने प्रवास केला आहे.
सहा वर्षांपासून अविरत सेवा -
रेणू यांना दोन लहान मुली आहेत. असे असतानाही सकाळी लवकर घरातून बाहेर पडत, दुपारी 12 वाजेपर्यंत त्या अंगणवाडी केंद्राचे काम पहातात. त्यानंतर त्या बोटीने परिसरातील पाड्यांपर्यंत पोहोचतात. एका पाड्यावर आठवड्यातून दोनदा भेट देतात. गेल्या 6 वर्षापासून त्या आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.
आजारी बालकांना नेतात दवाखान्यात -
दुर्गम भागात दळणवळणाच्या साधनांसह संपर्काचा अभाव आहे. त्यामुळे जर एखादे बालक गंभीर आजारी असेल तर तो निरोप फिरत्या दवाखान्याच्या डॉक्टरांपर्यंत पोहचवण्याचे काम रेणू करतात. या भागातील समन्वयाचे उत्तम माध्यमच रेणू बनल्या आहेत. गर्भवती मातांसाठी रेणू कायम धडपड करतात. मातांना सातत्याने समपुदेशन करतात. यासाठी कधी या डोंगरावर तर कधी त्या डोंगरावर सतत त्यांची भटकंती सुरूच आहे.
कमी वेतन असूनही कामात कसर नाही -
अंगणवाडी सेविकांना अतिशय कमी मानधन दिले जाते. मात्र, रेणू याबाबत तक्रार करत नाही. वेतन किती मिळते यापेक्षा आपण काम केल्याने किती जणांच्या चेहऱ्यावर हास्य फूलते हे महत्वाचे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. एकात्मिक बाल विकास विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा व योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावा म्हणून त्यांची धडपड निश्चितच कौतूकास्पद आहे. सोनाबाई बिज्या वसावे व सविताबाई दिल्या वसावे या आशा कार्यकर्तींच्या मदतीने रेणूचे काम अव्याहतपणे सुरूच आहे.
जिल्हा प्रशासनाकडून रेणू वसावेचा सन्मान -
अक्कलकुवा तालुक्यातील चिमलखेडी येथील अंगणवाडी सेविका रेणू वसावे यांनी कोरोना संकटाच्या काळात स्वत: बोटीने प्रवास करून दुर्गम भागात सेवा दिल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार करण्यात आला. चिमलखेडी अंगणवाडीला चांगल्या सुविधा देणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी सांगितले. रेणूताईंच्या कार्याचे देशभरात कौतुक झाले. त्यांच्या या कामगिरीचा गौरव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने साडीचोळी, अभिनंदनपत्र आणि मिठाई देऊन सत्कार केला. त्यांना प्रोत्साहन देणारे पती रमेश वसावे, मदतनीस सोनाबाई यांचाही सत्कार करण्यात आला. त्यांच्या मुलींनादेखील जिल्हाधिकाऱ्यांनी भेटवस्तू दिली.