धुळे - नंदुरबार विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा करिष्मा चालला नसून सलग तिसऱ्यांदा विधानपरिषदेत जाण्याची अमरीश पटेल यांना संधी मिळाली आहे. गेल्या तीस वर्षांपासून काँग्रेसकडे असलेली विधान परिषदेची जागा भाजपाने हिसकावून घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.
धुळे-नंदुरबार जिल्हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाची हवा असताना काही जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. विधान परिषदेच्या इतिहासातही काँग्रेसची एकाधिकारशाही कायम होती. मात्र या निवडणुकीत काँग्रेसच्या हातून विधान परिषदेची जागा भाजपाने हिसकावून घेतली आहे. प्रथमच विधान परिषदेची जागा भाजपाला अमरीश पटेल यांच्या रूपाने मिळाली. पटेल हे सलग तिसऱ्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. गेल्या 30 ते 40 वर्षांपासून काँग्रेसचा उमेदवार या जागेवर एकतर्फी विजयी होत होता. त्यात नंदुरबारचे भटेसिंग रघुवंशी हे सलग दोन वेळा काँग्रेसतर्फे आमदार होते. त्यानंतर सलग दोन टर्म त्यांचे चिरंजीव चंद्रकांत रघुवंशी यांना संधी मिळाली होती. गेल्या 2 टर्मपासून या मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी काँग्रेसकडून पटेल यांना मिळाली होती.
2009मध्ये काँग्रेसकडून मिळाली संधी
शिरपूर विधानसभेची जागा आरक्षित झाल्याने सर्वात अगोदर सन 2009मध्ये काँग्रेसकडून पटेल यांना विधान परिषदेत संधी मिळाली होती. त्यावेळी त्यांच्याविरोधात युतीतर्फे धुळ्याचे माजी महापौर भगवान करनकाळ यांना संधी देण्यात आली होती. 2015मध्ये झालेल्या निवडणुकीत अमरीश पटेल यांच्या विरोधात भाजपातर्फे तळोदा येथील शशिकांत वाणी यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यावेळी युतीकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने पटेल यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला.