नंदुरबार- जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने शेतकऱ्यांचा दूध दराच्या प्रश्नावर विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. यात अक्कलकुवा येथे खासदार डॉ. हिना गावित यांनी गरिबांना दूध वाटून सरकारचा निषेध नोंदविला आहे.
अक्कलकुवा येथे खासदार डॉ. हिना गावित यांच्या नेतृत्वाखाली गरिबांना दूध वाटून भाजपकडून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी अक्कलकुवा तालुका व शहराध्यक्ष यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग ठेवून सदर आंदोलन करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी दूध दराबाबत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा म्हणून गरिबांना दूध वाटप करून आंदोलन केले. दूध वाटपानंतर गावित यांनी अक्कलकुवा तहसीलदार यांना निवेदन दिले. त्याचबरोबर तालुक्यातील खापर, वाण्याविहिर, मोलगी येथे भाजपा कार्यकर्त्यांनी दूध वाटून आंदोलन केले.
शहादा येथे भाजपचे रस्तारोको
तर शहादा येथे भाजप आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली रस्तारोको आंदोलन करण्यात आले. जिल्हाभरात भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन केले. यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.