नंदुरबार- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०१९ साठी नंदुरबार जिल्ह्यात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिले आहेत.
नंदुरबारमध्ये मतदानादिवशी सर्व कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी - जिल्हाधिकारी - सुट्टी
कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिले आहेत.
सदर सुटी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व प्रशासन, कारखाने, दुकाने इत्यादिंना लागू असेल. यामध्ये खासगी कंपन्यांमधील प्रशासन, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स यांचा समावेश आहे.
लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ च्या परिच्छेद १३५ ब नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते. अथवा कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. त्यामुळे मतदारांना कोणत्याही परिस्थितीत २ ते ३ तासांची सवलत मतदानासाठी मिळेल याची मालकांनी दक्षता घ्यावी. मतदानासाठी योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता न आल्याची तक्रार झाल्यास संबंधित आस्थापना व्यवस्थापनाविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.