नंदुरबार - साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला विविध अख्यायिका जोडल्या आहेत. त्यात नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात ( Nandurbar Maliwada Area ) अक्षय तृतीयेच्या दिवशी सव्वा मणचा दगड उचलण्याची वर्षानुवर्षांच्या परंपरेचाही समावेश आहे. हा दगड जो सालदार (शेतात काम करणारा) उचलेल त्याला वर्षाचा दाम सर्वाधिक दिला जातो व जे अयशस्वी झाले त्याला देखील काम मिळते पण दाम कमी ( Farm Workers Selection ) मिळतो. ही परंपरा काही प्रमाणात मागे पडत आहे. माळीवाड्यात ही परंपरा तरुणांनी कायम ठेवली आहे.
आजही ही दगड उचलण्याची परंपरा कायम :आधुनिक युगात अजूनही बहुतेक जुन्या जाणत्यांनी लावून ठेवलेल्या परंपरा सुरूच आहेत. त्यातील एक परंपरा म्हणजे सालदारने (शेतात काम करणारा) दगड उचलून आपली योग्यता सिद्ध करण्याची परंपरा होती. साधारणतः या दगडाचे वजन सव्वा मण असल्याचे जुने-जाणते सांगतात. शेतीची कामे करण्यासाठी जो शेतगडी असतो त्याची खान्देशात अक्षय तृतीयेला निवड केली जात असते. प्रत्येक भागात सालदार निवड करण्याची वेगळी पद्धत असते. नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात सालगडी ठरविण्याची वेगळी पद्धत वर्षोनावर्षं जोपसली जात आहे.
सालदारचे वर्षभराचे पॅकेज ठरविले जाते : एखाद्या कॉर्पोरेट कंपनीत कामगारांची नियुक्ती करतांना त्याच्या अनुभव आणि अनेक चाचण्या घेतल्या जात असतात. त्याचप्रमाणे शेतात वर्षभर राबणाऱ्या गड्याची नियुक्ती करतांना वर्षभराचा पगार म्हणजे साल ठरविण्यासाठी अक्षय तृतीयेच्या मुहूर्त निवडला जातो. गड्याचं साल ठरवितांना त्याची ताकद आणि चिकाटी पहिली जाते. ही परंपरा आजही माळीवाडा परिसरात या गड्याची निवड करण्यासाठी वापरली जाते. या भागातील चौकात असेल्या दोन मोठ्या दगडांची (गोट्याची) पूजा केली जाते. त्यानंतर त्या ठिकाणी आलेले तरुण या गोट्यांना उचलण्याचा प्रयत्न करतात. जे तरुण हे गोटे उचलतात मग त्याच्या वर्षाचा पगार ठरविण्याची लगबग सुरु होते. यावर्षी सालदारांचे वर्षभराचे पॅकेज 60 हजारापासून ते एक लाख 10 हजार रुपयापर्यंत ठरत आहेत. त्याचसोबत त्याला कपड्याचे दोन जोड आणि दोन पोते धान्य दिलं जात. तर यशस्वी झाला त्याला त्याची योग्यता पाहून त्याला पैसे व धान्य दिले जात असते. माळीवाडा परिसरात शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा टिकून आहे.