मुंबई -राज्यातील कोरोनाची स्थिती अतिशय गंभीर आहे. एकीकडे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आरोग्य सुविधेच्या कमतरतेमुळे वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वे पुढे आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील नंदुरबार रेल्वे स्थानकावर आयसोलेशन कोचचा वापर सुरू झाला आहे. आतापर्यंत रेल्वेच्या आयसोलेशन कोचममध्ये 97 कोविड रुग्णांना दाखल केले आहे.
66 रूग्णांना डिस्चार्ज
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सौम्य कोरोना असलेल्या रुग्णांसाठी रेल्वेच्या आयसोलेशन कोचचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्या भागात कोविड केअर सेंटर नाही किंवा त्यांची संख्या कमी आहे. अशा भागात रेल्वेचे आयसोलेशन कोच उपयुक्त ठरत आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात एकूण 128 आयसोलेशन कोच तयार करण्यात आले आहेत. या पैकी 21 कोचचा वापर नंदुरबार रेल्वे स्थानकात 18 एप्रिलपासून सुरू झाला आहे. एका आठवड्यात नंदुरबारच्या आयसोलेशन कोचमध्ये एकूण 54 रूग्ण दाखल झाले. तर, आतापर्यंत एकूण 97 कोविड रुग्ण झाले. यापैकी 66 जणांचा डिस्चार्ज देण्यात आला असून 31 जण सध्या आयसोलेशन कोचमध्ये आहेत.