नंदुरबार -चार दिवसांपूर्वीच जिल्ह्यात आढळलेल्या पहिल्या रूग्णाच्या कुटुंबासह बरा होवून घरी परतल्याने नंदुरबार शहर कोरोनामुक्त झाल्याचा आनंद होता. मात्र, हा आनंद केवळ दोनच दिवस टिकला. शहरातील एका 80 वर्षीय वृद्ध महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर काही तासाच ही महिला दगावली. महिलेच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. प्रशासनाने तत्काळ खबरदारी घेत सदर भागात बॅरिकेटींग करुन जंतूनाशक फवारणी केली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात 17 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला होता. या रूग्णाच्या कुटूंबातील अन्य तिघांनाही लागण झाली होती. त्या पाठोपाठ शहाद्यातील एका युवकाचा कोरोनामुळे बळी गेला. नंदुरबार शहरात आढळून आलेल्या पहिल्या रूग्णासह कुटूंबातील तिघांचीही प्रकृती सुधारल्याने ते बरे होवून चार दिवसांपूर्वीच घरी परतले. त्यामुळे नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, गुरुवाती रात्री अहिल्याबाई विहीर भागात राहणार्या एका 80 वर्षीय वृद्धेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली.