नंदुरबार- जिल्ह्यात एकाच दिवशी आठ जणांचे स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात रजाळे येथील पाच, जिल्हा रुग्णालयातील २ तर धुळे येथून आलेल्या एकाचा समावेश आहे. आजपर्यंतचा जिह्यात कोरोनाबाधिताचा हा उच्चांक ठरला आहे. महत्वाचे म्हणजे, जिल्हा रुग्णालयातील दोघांना कोरोनाची बाधा झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. दरम्यान, नंदुरबार येथे प्रतिबंधीत क्षेत्र तयार करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील 29 जणांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यात आठ जणांना कोरोना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील एकाचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रजाळे येथील 66 वर्षीय वृध्दाला लागण झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना क्वारंटाईन करुन त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात एका सहा वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. याशिवाय जिल्हा रूग्णालयातील 2 कर्मचारी आणि धुळे जिल्ह्यातील एका 35 वर्षाच्या पुरूषाला कोरोनाची लागण झाली आहे. एकाच दिवशी आठ रूग्ण बाधीत आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जिल्हा रूग्णालयातील एक कर्मचारी नंदुरबार शहरातील भोई गल्ली परिसरातील रहिवाशी आहे. प्रशासनाने खबरदारी घेत बाधितांच्या वास्तव्याचा परिसर सील केला असून वेळोवेळी निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे. रजाळे येथील बाधीतांच्या संपर्कातील 22 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून संपर्कातील आणखी व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.