नंदुरबार- जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतींपैकी 23 ग्रामपंचायती या आधीच बिनविरोध झाल्याने काल 64 ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान पार पडले. ग्रामीण भागात दिवसभर मतदारांचा उत्साह दिसून आल्याने मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. नंदुरबार जिल्ह्यात 64 ग्रामपंचायतींसाठी 77.80 टक्के मतदान झाले.
तालुकानिहाय मतदान टक्केवारी
नंदुरबार तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींसाठी 82.47 टक्के, शहादा तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींसाठी 73.09 टक्के, अक्कलकुवा तालुक्यातील 1 ग्रामपंचायतीसाठी 81.31 टक्के, नवापूर तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींसाठी 85.61 टक्के, तळोदा तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीसाठी 79.24 टक्के मतदान झाले आहे. धडगांव-अक्राणी तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींसाठी 76.51 टक्के मतदान झाले आहे.
मतदान प्रक्रियेत वृद्धांना तरुणांची मदत
सकाळपासूनच ग्रामीण भागातील मतदारांसह वृद्धांनी मतदानाचा मतदानाचा हक्क बजावला. युवकांनी वृध्दांना मदतकार्य करीत मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवले. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनीही मतदान केंद्रांना भेटी देवुन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. दरम्यान सोमवार दि.18 जानेवारी रोजी तहसिल कार्यालयाच्या ठिकाणी मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी मतदान केंद्रांना भेट
नंदुरबार तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींसाठी 82.47 टक्के मतदान झाले आहे. नंदुरबार तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींपैकी 15 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 7 ग्रामपंचायतींसाठी काल मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ठिकठिकाणी मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी मतदान केंद्रांना भेट देवुन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह दिसुन आला. दुपारी 11 वाजेनंतर मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. कोपर्ली ग्रा.पं.साठी 82.43 टक्के, भालेर ग्रा.पं.साठी 76.40 टक्के, वैंदाणे ग्रा.पं.साठी 81.90 टक्के, कंढरे ग्रा.पं.साठी 91.56 टक्के, हाटमोहिदा ग्रा.पं.साठी 83.08 टक्के, भादवड ग्रा.पं.साठी 89.60 टक्के तर कार्ली ग्रा.पं.साठी 82.12 टक्के मतदान झाले आहे. नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक मतदान कंढरे ग्रा.पं.साठी 91.56 टक्के झाले आहे.
शहादा तालुक्यात 73 टक्के मतदान
शहादा तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींसाठी 73.09 टक्के मतदान झाले असून ग्रामपंचायत मतदानासाठी ग्रामीण भागातील मतदारांमध्ये सकाळपासूनच उत्साह दिसुन आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत मतदान प्रक्रिया पार पडली. शहादा तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींपैकी 6 ग्रामपंचायती याआधीच बिनविरोध झाल्याने 21 ग्रामपंचायतींचा 164 जागांसाठी 368 उमेदवारांचे राजकीय भविष्य मतदान यंत्रात बंद झाले. शहादा तालुक्यातील सोनवद त.श.ग्रामपंचायतसाठी सर्वाधिक 87.01 टक्के तर सर्वात कमी टेंभे त.सा.बु.54.13 टक्के, मतदान झाले आहे. सकाळपासूनच शहादा तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी मतदारांनी उत्साह दाखविला. 21 ग्रामपंचायतींच्या 164 जागांसाठी 368 उमेदवार निवडणूक लढवित होते. यासाठी 15 हजार 651 पुरूष व 14 हजार 611 असे एकुण 30 हजार 262 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 7.30 वाजेपासून ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत 65.77 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.