नंदुरबार - रजाळे येथील 66 वर्षीय कोरोनाबाधिताच्या संपर्कातील नातलगांसह 18 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच, गाव पाच दिवस पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाबाधिताच्या संपर्कातील लोकांचे सर्वेक्षण आरोग्य विभागामार्फत केले जात आहे. तर, सदर बाधित रुग्ण तत्पूर्वी नंदुरबार शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी गेल्याने रुग्णालय सील करुन डॉक्टरासह कर्मचार्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथे मुंबई येथून आलेल्या एका 66 वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. हा बाधित मुंबईहून ठिकठिकाणी टप्प्याने प्रवास करीत रजाळे गावात आला होता. गुरुवारी रात्री अहवाल प्राप्त होताच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी रजाळे येथे पोहोचले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जे. आर. तडवी, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते. पोलिसांकडून गावात बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर, संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन केले आहे. बाधिताच्या संपर्कातील लोकांची माहिती व सर्वेक्षणाचे आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. सदर बाधिताच्या पाच नातेवाईकांसह 18 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. एक नातेवाईक जिल्हा रुग्णालयात दाखल आहे.