महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नंदुरबार जिल्ह्यात 23 ग्रामपंचायती बिनविरोध तर 1, 345 उमेदवार रिंगणात - Nandurbar election news

माघारीअंती जिल्ह्यातील 23 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून नंदुरबार तालुक्यातील 14, शहादा तालुक्यातील 6, नवापूर तालुक्यातील 2 तर तळोदा तालुक्यातील 1 ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.

Nandurbar
Nandurbar

By

Published : Jan 5, 2021, 4:44 PM IST

Updated : Jan 5, 2021, 7:39 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू असून काल माघारीअंती अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. जिल्ह्यात 631 इच्छुकांनी माघार घेतल्याने निवडणुक रिंगणात 1345 उमेदवार असल्याने ते आपले राजकीय भवितव्य आजमावित आहेत. तसेच काल माघारीअंती जिल्ह्यातील 23 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून नंदुरबार तालुक्यातील 14, शहादा तालुक्यातील 6, नवापूर तालुक्यातील 2 तर तळोदा तालुक्यातील 1 ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता 64 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे.

तहसील कार्यालयांना आले यात्रेचे स्वरूप

जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालय परिसराला इच्छुकांसह ग्रामीण भागातील नागरिकांच्या गर्दीने यात्रेचे स्वरूप आले होते. काल माघारीच्या अंतिम दिवशी जिल्ह्यातील अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. याप्रसंगी ग्रामीण भागातील उमेदवारांसह मतदार मोठ्या संख्येने तहसील कार्यालय परिसरात दाखल झाले होते.

जिल्ह्यातील 23 ग्रामपंचायती बिनविरोध

नंदुरबार जिल्ह्यात 87 ग्रामपंचायतींची निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. त्यात माघारीअंती जिल्ह्यातील 23 ग्रामपंचायती निवडणुकीपूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीतील सदस्यांसह पदाधिकारी व समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.

64 ग्रामपंचायतींसाठी मतदान

जिल्ह्यात आता 64 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. नंदुरबार तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींसाठी 459 अर्ज शिल्लक होते. काल माघारीअंती 278 इतक्या उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात 181 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. नंदुरबार तालुक्यातील 14 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता आठ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे.

या ग्रामपंचायतींचा समावेश

शहादा तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींसाठी छाननीनंतर 648 अर्ज शिल्लक होते. त्यापैकी 199 इच्छुकांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात 449 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. तसेच शहादा तालुक्यातील 6 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून 21 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. नवापूर तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींसाठी शिल्लक असलेल्या 280 अर्जांपैकी 18 उमेदवारांनी माघार घेतली. त्यात धुळीपाडा येथील 4, वडकळंबीतील 2, उमराण येथील 2, बंधारपाडा येथे 3, ढोंग येथे 4, उकाडापाणी, नांदवन व पळसून ग्रामपंचायतीत प्रत्येकी 1 असे 18 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तालुक्यातील निवडणुक रिंगणात 229 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. माघारीअंती दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून नवापूर तालुक्यात 12 ग्रा. पं.साठी निवडणूक होत आहे. तळोदा तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींकरीता असलेल्या 181 अर्जांपैकी 47 उमेदवारांनी आपले नामांकन मागे घेतले. रिंगणात 134 उमेदवार शिल्लक राहिले आहेत. तळोदा तालुक्यातील 1 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने 6 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. अक्राणी तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 408 उमेदवारांचे अर्ज होते. त्यापैकी 79 इच्छुकांनी माघार घेतल्याने 333 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी 29 इच्छुकांचे अर्ज शिल्लक होते. त्यापैकी 10 जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने 19 अर्ज शिल्लक राहिले असून तालुक्यात एका ग्रामपंचायतीकरीता निवडणूक होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणातील 2013 उमेदवारांपैकी 631 इच्छुकांनी माघार घेतल्याने 1345 उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावित आहेत.

प्रचाराचा धुराळा

माघारीच्या दिवशी काही इच्छुकांनी माघार घेतल्याने जिल्ह्यात 23 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून आता 64 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणूक होणार्‍या ग्रामपंचायतीतील उमेदवारांना सायंकाळी चिन्हवाटप करण्यात आले. तसेच आजपासून निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या गावांमध्ये रिंगणातील उमेदवारांकडून प्रचाराचा धुराळा उडणार आहे.

Last Updated : Jan 5, 2021, 7:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details