नंदुरबार- जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला असून शुक्रवारी एकाच दिवशी 17 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात नंदुरबारातील सहा, शहाद्यातील आठ जणांना तर नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी, नवापूर शहर व अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे कोरोनाचे प्रत्येकी एक रुग्ण आढळले आहेत. नंदुरबार येथील एका 14 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. नवापूर शहर व खोंडामळी गावात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 180 वर पोहोचला आहे. तर नंदुरबार येथील सिंधी कॉलनीतील दोन बाधितांनी कोरोनावर मात केल्याने संसर्गमुक्त झाले आहेत. दरम्यान नवापूर शहर दोन दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे. या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.
खान्देशात जळगाव व धुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या तुलनेत कोरोनाच्या आकडेवारीत नंदुरबार जिल्हा मागे असला तरी गेल्या महिन्याभरापासून नंदुरबार जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. जळगाव व धुळे जिल्हा कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून या दोन्ही जिल्ह्यांनी रुग्णांच्या आकडेवारीत हजारांचा आकडा पार केला आहे. असे असताना नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी महिन्याभरापासून दिवसेंदिवस आढळून येणार्या कोरोना रुग्णांमुळे आकडेवारी 200 च्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. जिल्ह्यात आठ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसात दोन बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने जिल्हावासिय चिंतेत आहेत. एकीकडे चिंता असली तरी बाधित रुग्ण कोरोनावर मात करित असल्याने ते संसर्गमुक्त होत असल्याने ही दिलासादायक बाब आहे.
शुक्रवारी दुपारी आलेल्या अहवालात पाच नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यात नंदुरबार शहरातील रेल्वे कॉलनीतील 36 वर्षीय पुरुष, देसाईपुरा भागातील 50 वर्षीय महिला व नंदुरबार पंचायत समितीतील 32 वर्षीय पुरुष तर नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी येथे 50 वर्षीय पुरुष व नवापूर येथील मंगलदास पार्कमधील 65 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी या गावात कोरोनाचा एकही रुग्ण नसतांना काल आलेल्या अहवालात गावातील एक जण पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोनाने खोंडामळीमध्ये शिरकाव केला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.