नंदुरबार - गुजरात राज्यातील जुनागढ येथे मजुरीसाठी गेलेले जिल्ह्यातील 1500 आदिवासी मजूर श्रमिक एक्सप्रेसने येथे परतले. या मजूरांना आपल्या गावी आणण्यासाठी पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी विशेष प्रयत्न केले. या सर्व मजुरांना राज्य परिवहन महामंडळाच्या 52 बसेसने त्यांच्या गावी पाठविण्यात आले.
जिल्ह्याच्या विविध भागातील हे मजूर लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यानंतर या मजूरांकडून आपल्या मुळ गावी जाण्याची मागणी करण्यात येत होती. त्या सर्व मजूरांना आणण्यासाठी विशेष श्रमिक रेल्वेची व्यवस्था करण्याचे निर्देश पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी राज्याच्या मुख्य सचिव आणि मदत आणि पुनर्वसन सचिवांना दिले होते. त्यांनी गुजरातमधील प्रशासनाशीदेखील संपर्क साधला होता. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी या संदर्भात जुनागढ प्रशासनाशी समन्वय साधला. या प्रयत्नांमुळे हे सर्व मजूर सुखरुप नंदुरबार रेल्वे स्थानकावर पोहोचले. बुधवारी रात्री 9.30 वाजता जुनागढ येथून विशेष श्रमिक एक्सप्रेसने सर्व मजूर निघाले. यानंतर गुरुवारी सकाळी 8.30 वाजता नंदुरबार रेल्वे स्थानकावर पोहोचले.
रेल्वेस्थानकावर आगमन झाल्यानंतर 10 डॉक्टर आणि 10 आरोग्य सेवकामार्फत बोगीनुसार प्रत्येक मजुरांचे थॅर्मल स्कॅनिंग करण्यात आले. त्यांच्या हातावर होम क्वॉरटाईनचा शिक्का मारुन त्यांची नोंद घेण्यात आली.
सर्व मजूरांना तालुकानिहाय अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले. त्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत 52 बसेसची व्यवस्था करण्यात आलेली होती. मुळ गावी परल्यानंतर सर्व मजूराना त्यांच्या घरी चौदा दिवस क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. यावेळी रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये, म्हणून गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आलेल्या प्रवाशांमध्ये अक्कलकुवा 27, तळोदा 253, धडगाव 22, नंदुरबार 80, नवापुर 7 आणि शहाद्यातील 1101 असे नंदुरबार जिल्ह्यातील 1490 प्रवासी होते.