नंदुरबार - दुर्गम भागात इंटरनेट सेवा सुरळीत नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील पहिली ते चौथीच्या 1506 शाळांपैकी 1430 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शहरी भागातील 76 शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत.
जिल्ह्यातील 1430 प्राथमिक शाळा सुरू, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड योग्य त्या उपाययोजना करून शाळा सुरू -
अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा आणि नवापूरचा शहरी भाग वगळता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ, नये यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शिक्षण विभागाने कोरोनाविषयक आवश्यक खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली आहे.
तालुकानिहाय केंद्रातील शाळा -
नंदुरबार तालुक्यात 14 केंद्रातील 190, नवापूर 19 केंद्रातील 254, शहादा 18 केंद्रातील 242, तळोदा 9 केंद्रातील 132, अक्कलकुवा 19 केंद्रातील 323 आणि धडगाव तालुक्यात 14 केंद्रातील 289 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. नंदुरबार तालुक्यातील 12 आणि शहादा तालुक्यातील 29 शाळा कोरोनाचा संसर्ग अधिक असलेल्या भागात असल्याने सुरू करण्यात आलेल्या नाहीत. नवापूरच्या शहरीभागातील 16 आणि तळोद्याच्या शहरी भागातील 19 शाळादेखील सुरू करण्यात आलेल्या नाहीत, अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी दिली आहे.