नंदुरबार- राज्यात लसीकरण संथ गतीने सुरू असले तरी आदिवासीबहुल आणि अतिदुर्गम असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये लसीकरणाला नागरिकांकडून प्रतिसाद दिला जात आहे. राज्यात अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात कोरोना लसीकरणाबाबत विविध अफवा ग्रामीण भागात पसरल्या होत्या. आदिवासी बहुल भागात लसीकरणाबाबत असलेले गैरसमज आणि अफवा यांच्यावर लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांनी मात केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या पुरूषोत्तमनगर, सिंदगव्हान आणि सागळी या तीन गावांनी ४५ वर्षावरील लसीकरणाचे उद्दिष्ट १०० टक्के साध्य केले आहे.
लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये गैरसमज
लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर नागरिकांमध्ये या लसीकरणाबाबत गैरसमज निर्माण झाले होते. लसीकरण केल्यामुळे कोरोना होतो, लस घेतल्यानंतर ताप आला आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले तर तो रुग्ण जिवंत परत येत नाही अशा प्रकारच्या अफवांमुळे सुरुवातीला दिड महिना नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद दिला नाही. त्यांनतर प्रशासनाने नागरिकांच्या मनातील हे गैरसमज दूर करण्यासाठी जिल्ह्यात त्यासंदर्भात बहुस्तरीय जनजागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली आणि नागरिक लसीकरण करण्यास उद्युक्त झाले, असे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांनी याविषयी पत्र सूचना कार्यालयाला सांगितले.
लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती
नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत गैरसमज निर्माण झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाची मोठ्या प्रमाणात डोकेदुखी वाढली होती. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता जिल्हा प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने बैठक आयोजित करून जनजागृती अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला. या जनजागृती अभियानात जिल्हाधिकारी, खासदार, आमदार आणि इतर वरिष्ठ नेते, अधिकारी यांनी ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या व लसीकरणाबाबत नागरिकांमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. लसीकरणाबाबत आदिवासींमध्ये असलेले गैरसमज दूर करणाऱ्यांसाठी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी खान्देशी भाषेत व आदिवासी भाषेच्या ऑडीओ क्लिप्स तयार करून दुर्गम भागातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी देखील आदिवासी भाषेत ऑडियो क्लिप्स तयार करून त्या आपल्या मतदार संघातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविल्या.
अफवांबाबत जनजागृत
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत आकाशवाणी, दूरदर्शन यांनी लसीकरणाबाबत वेळोवेळी माहिती देऊन गैरसमज दूर केले. त्याबरोबरच पुण्यातील प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोतर्फे महाराष्ट्रात कोविड-19 लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृतीविषयक व्यापक मोहिमेअंतर्गत 36 जिल्ह्यांत 16 व्हॅन्सद्वारे फिरती बहुमाध्यमी प्रदर्शने आयोजित करण्यात आली. या व्हॅन्सनी प्रत्येक दिवशी सुमारे शंभर किलोमीटर प्रवास करून रस्त्यावरच्या गावागावांमध्ये लस तसेच लसीकरणाविषयी पसरलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनजागृत केली.या उपक्रमाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातही 25 फेब्रुवारी ते 6 मार्च 2021 या कालावधीत लसीकरणाबाबत जनजागृती मोहिम राबविण्यात आली होती.
लसीकरणाच्या जनजागृतीसाठी ग्रामपंचायतीतर्फे विविध उपक्रम