नांदेड- कौटुंबिक वादातून हिमायत नगर येथील एका तरुणाने थेट पोलीस ठाणे गाठून तेथेच पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना १४ जुलैच्या सायंकाळी ६ वाजता घडली होती. या घटनेने हिमायतनगर परिसरात खळबळ उडाली आहे. शेख सद्दाम शेख अहमद (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे.
कौटुंबिक वादातून तरुणाने पोलीस ठाण्यातच स्वतःला घेतले पेटवून, उपचार सुरू - Police Staff S.S Pawar
सद्दामचे घरी पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर त्याने पोलीस ठाणे गाठून हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शेख सद्दाम शेख अहमद (२५) हा रागाच्या भरात हिमायतनगर येथील पोलीस ठाण्यात गेला आणि काही कळायच्या आत त्याने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला आग लावून घेतली. ही घटना पाहताच ठाण्यातील पोलीस कर्मचारी एस.एस.पवार, जाधव आणि सहकाऱ्यांनी लगेच धावाधाव करीत त्याच्या अंगावरची आग विझवण्यासाठी कापड टाकले. त्यानंतर लगेच त्याला उपचारासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत शेख सद्दाम शेख अहमद ९० टक्के भाजला असून यात मदतीला धाऊन आलेले पोलीस कर्मचारी पवार यांचा हातही भाजला आहे.
शेख सद्दामवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सद्दामचे घरी पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर त्याने पोलीस ठाणे गाठून हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र बोरसे करीत आहेत. घटनेनंतर जाळून घेतलेल्या शेख सद्दामच्या नातेवाईकांनी रात्री पोलीस ठाणे गाठून भाजलेल्या सद्दामच्या पत्नी विरुद्ध तक्रार दिली आहे.