नांदेड- शहरातील हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्टेशनवर एका माथेफिरू तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. तो मुळचा पंजाब येथील रहिवासी असून त्याच्यावर अन्याय झाल्याच्या कारणामुळे त्याने हे कृत्य केल्याची माहिती त्याने दिली. भगवंतसिंह(35) असे त्याचे नाव आहे.
ती व्यक्ती पंजाब राज्यातील-
हा तरुण मुळचा पंजाबमधील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे. तो 'माझ्यावर काही लोकांनी अन्याय केल्याचे लोकांना सांगत होता. पत्रकारांना बोलवा आणि माझे म्हणणे एकूण घ्या, असे या तरुणाचे म्हणणे होते. या तरुणाला नागरिक आणि रेल्वे पोलिसांनी खाली उतरण्याची विनंती केली, मात्र तो ऐकायला तयार नव्हता.
आत्महत्येचा हा थरार तब्बल चार तास सुरू होता. बुधवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास तो तरुण रेल्वे स्टेशनच्या शेडवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. तत्पूर्वी तो रेल्वे स्टेशनवर चढून त्याच्यावर झालेल्या अन्यायाची व्यथा नागरिकांना ओरडून सांगत होता. हा प्रकार लक्षात येताच रेल्वे पोलिसांच्या मदतीने नांदेड पोलिसांनी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र तो खाली यायला तयार नव्हता त्याला आत्महत्या करायची असल्याचे तो वारंवार सांगत होता.
माथेफिरू तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न या दरम्यान पोलिसांनी अग्नीशामक दलास पाचारण केले. तसेच त्या तरुणाने तो पंजाबचा रहिवासी असल्याचे सांगताच पोलिसांनी काही शिख बांधवांना घटनास्थळी पाचारण केले. त्यानंतर त्या शिख बांधवांनी त्याच्यावर झालेल्या अन्यायाबाबत मदतीचे आश्वासन दिल्यानंतर अखेर चार तासानंतर तो तरुण खाली उतरला.