नांदेड -जिल्ह्यातील अर्धापूर शहरातील एक तरुण शिक्षकाने पगाराची शास्वती नसल्यामुळे आपल्या राहत्या घरातच गळफास घेवून आत्महत्या केली आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली. याच बरोबर संस्था चालकाला दिलेले पैसा परत घेण्याचेही त्याने चिठ्ठीत लिहिले आहे.
चंद्रशेखर नागनाथ पांचाळ, असे मृत शिक्षकाचे नाव आहे. त्यांचे शिक्षण एम. ए. बीएडपर्यंत झाले असून ते नांदेडमधील फुलेनगरात राहत होते. गेल्या ४ वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना एक चिमुकली मुलगीही आहे. आज ना उद्या पगार होईल, आपल्या संसारास चांगले दिवस येतील. या आशेवर गेल्या ५ ते ६ वर्षांपासून चिंचगव्हाण येथील एका खासगी शाळेत शिक्षणाचे काम करीत होते, तर त्यांची पत्नी स्पर्धा परिक्षेची तयारी करीत आहे.
खासगी शाळेतील शिक्षकांना विना पगार काम करावे लागते. नोकरीसाठी संस्थाचालकाला देणगीही द्यावी लागते. शाळेला आनुदान मिळेल, पगार होईल, या आशेवर शिक्षक आपले अध्यापनाचे काम करतात. असेच काम चंद्रशेखर पांचाळ करीत होते. मात्र, पगार होणार नाही याची काहीच शाश्वती नाही. या तणावाखाली असलेल्या चंद्रशेखर पांचाळ यांनी आपली राहत्या घरी गळफास घेवून आपले जीवन संपवले आहे. या तरुण शिक्षकाच्या आत्महत्येमुळे राज्यातील खासगी शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सुसाईड नोट
काय लिहिले चिठ्ठीत?
मृत चंद्रशेखर पांचाळ यांनी ह्रदय स्पर्शी चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये त्याने लिहले आहे की, आण्णा मला माफ करा, मी सोडून चाललो. माझ्याने आता जगणे होत नाही. शाळेत मन लागत नाही. एवढा पैसा देऊन किती दिवस फुकट काम करायचे? पगार कधी चालू होईल? याचीसुध्दा खात्री राहिली नाही. इतके दिवस वाटत होते की, पगार आज होईल उद्या होईल. पिल्लूची काळजी घ्या. मला माहित आहे, तुम्ही तिला चांगल्या प्रकारे सांभाळणार. भाग्यश्री, आई, सोनू, पिंटू सर्वजण मला माफ करा. मी तुमच्यासोबत होतो त्या प्रत्येक क्षणाची आठवण मला आत्ता होते. पण मला जावे लागतेय तुम्हाला सोडून. मला माहित आहे, तुम्हाला मोठा धक्का बसेल. पण यातून तुम्ही बाहेर पडाल. भाग्यश्री तुला जज व्हायचे आहे. किमान माझ्यासाठी तू करशीलच. पिल्लुची काळजी घे. पप्पा कामाला गेलेत म्हणून सांग. तिला रडू देऊ नकोस. आण्णा, आई आणि स्वतःची काळजी घ्या. माझ्यासाठी दिलेले पैसे व्यवहारेकडून घ्या. पिल्लूसाठी कामाला येतील.