नांदेड- देशात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, यामुळे रोजंदारीने काम करणारे तसेच पोटासाठी भटकंती करून उदनिर्वाह करणाऱ्यांवर उपसामारीचे दिवस आले आहे. त्यामुळे, अशा लोकांना काल जुन्या अर्धापूर शहरातील तरुणांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. त्यामुळे, घरोघरी जाऊन अन्न मागून पोटाची खळगी भरणाऱ्यांना थोडासा दिलास मिळाला आहे.
अर्धापूर शहरातील अर्धापूर-नांदेड मार्गाच्या बाजूला मोकळ्या जागेत मराठवाड्यासह विदर्भ आदी भागातील अनेक गरीब कुटुंबीय वास्तव्यास आहे. यात मुर्तीकार, फोटो, काचेचे मंदिर विकणारे, भिक्षा मागणारे यांचा समावेश आहे. पोटासाठी मिळेल ते काम करून भटकंती करून घरोघरी अन्य धान्य मागून हे कुटुंबीय आपला उदनिर्वाह करतात. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यातील सर्व जिल्ह्यात संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे, या गरीब कुटुंबीयांना खायचे हाल झाले आहेत. कुठेच काही मिळत नसल्याने ही कुटुंबीय उपासमारीच्या उंबरठ्यावर होती.