'पब्जी' खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू, नांदेडमधील घटना - पब्जी गेम खेळताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू
पब्जी गेम खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना माहूर तालुक्यात घडली आहे. त्याच्या मृत्यूनंतरही हा गेम त्याच्या मोबाईलमध्ये सुरुच होता.
नांदेड - स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन गेमचे शहरी भागानंतर आता ग्रामीण भागातही प्रमाण वाढत आहे. मोबाईलवर पब्जी नामक गेम खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना माहूर तालुक्यात घडली आहे. तरूणावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करताना पब्जी सारख्या घातक गेमवर शासनाने बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जिल्ह्यातील मौजे मछींद्र पार्डी (ता.माहूर) येथील तरूण राजेश नंदू राठोड (वय 18 वर्षे) हा तरूण शनिवारी (दि. 25 जुलै) आपल्या घराशेजारी मोबाईलवर पब्जी गेम खेळत बसला होता. त्यावेळी वडील व घरातील इतर मंडळी आपापल्या दैनंदिन कामात व्यस्त असल्याने राजेशकडे कुणाचेच लक्ष नव्हते. राजेश हा गेम खेळताना अचानक कधी गतप्राण झाला हे कुणाच्याही लक्षात आले नाही. राजेश हा कोणत्याही प्रकारची हालचाल करत नसल्याचे त्याच्या वडिलांच्या लक्षात आले. गेम खेळताना डिप्रेशनमध्ये गेल्याने हृदयविकाराचा धक्का आला असावा त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता ग्रामस्थांकडून वर्तविण्यात आली आहे.
राजेश पब्जीच्या एवढ्या आहारी गेला होता की, येथे मोबाईल नेटवर्क कमजोर असल्याने पुरेसे नेटवर्क मिळविण्यासाठी राजेश हा कधी कधी झाडावर बसून देखील पब्जी गेम खेळताना त्यास अनेकांनी पाहिले असल्याचे गावकऱ्यांनी सागितले. ऐन नागपंचमीच्या दिवशी घडलेल्या या अनपेक्षित घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अत्यंत शोकाकूल वातावरणात राजेशच्या पार्थिवावर पार्डी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.