नांदेड -हिमायतनगर शहरातील बसस्थानक परीसरात आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान महाविद्यालयीन तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या झाल्याची घटना घडली आहे. या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाला आहे. यश उत्तम मिराशे (१७) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असून या घटनेत एकजण जखमी झाला आहे. तर आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या घटनेमुळे हिमायतनगर येथे दहशतीचे वातावरण पसरले आहे.
किरकोळ वादातून झाली हत्या -
हिमायतनगर तालुक्यातील कार्ला पी. येथील यश उत्तम मिराशे (17) हा हिमायतनगर शहरात शिक्षण घेण्यासाठी दररोज यायचा. पण आज 11 सप्टेंबर रोजी बसस्थानकात अनुज पवणेकर यांच्याशी त्याचा किरकोळ वाद झाला. त्यानंतर अनुजने धारधार शस्त्राने वार करून यश मिराशे यांच्या छातीत वार केला. त्यानंतर हे भांडण सोडविण्याकरिता आलेल्या त्यांच्या सहकाऱ्यालाही अनुजने जखमी केले. नंतर तो बोरी रोडच्या दिशेने पसार झाला होता. त्यानंतर उपस्थितांनी यश मिराशे व गंभीर जखमी असलेल्या सोहमला ग्रामीण रुग्णालयात नेले. यावेळी डॉक्टरांनी यशचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.