नांदेड : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून हिंदुत्वावरून चांगलेच रणकन्दन सुरु आहे. परंतू हेच हिंदुत्व एका आदिवासी समाजातील डॉक्टर युवतीच्या उच्च शिक्षणात अडसर ठरले ( Difficulty in Higher education in tribal society ) आहे. जात पडताळणी समितीने जात प्रमाणपत्र अवैध ठरवताना इतर कारणासोबत हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित केल्याने महादेव कोळी समाजात तीव्र असंतोष आहे. या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी महादेव कोळी समाजाच्यावतीने दि. ५ रोजी देवादिकांच्या मूर्तीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले (Mahadev Koli Samaj procession at Collector office ) आहे.
जात प्रमाणपत्रात अडचणी :हदगाव तालुक्यातील खरटवाडी येथील मयुरी श्रीकृष्ण दसरु पुंजरवाड या युवतीने आपले एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. तिचे वडील श्रीकृष्ण पुंजरवाड हे जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी नोकरीत रुजू होताना महादेव कोळी समाजाचे जात प्रमाणपत्र दिल्याने त्यांना अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाल्या. त्यांच्या जात प्रमाण पत्राच्या आधारे मयुरीलाही वैद्यकीय शिक्षणात अनुसूचित जमातीच्या सुविधा मिळाल्या. त्यानंतर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने त्यांच्या जात प्रमाणपत्राची फेर तपासणी केली. त्यावेळी श्रीकृष्ण पुंजरवाड हे मूळ कोळी समाजाचे असल्याचा निष्कर्ष समितीने काढला. त्यांच्या निकटच्या व रक्ताच्या नातेवाईकाच्या जात प्रमाण पत्रातील त्रुटीही समितीने समोर ठेवल्या. त्यांच्या नातेवाईकांनी जात प्रमाणपत्रात बदल केल्याचा निष्कर्षही समितीने काढला. जात प्रमाण पत्राबद्दल विस्तृत अहवाल समितीने दिला.