नांदेड - कंधार तालुक्यातील कळका येथे ७ जून २०१३ रोजी विनयभंगामुळे विधवा महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणातील आरोपीस अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरी आणि ९ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीस चार वर्षांची सक्तमजुरी - शिक्षा
विधवा महिलेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीस चार वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
घटनेनंतर पीडित विधवा महिलेच्या सासूने गावातील भगवान माधवराव गायकवाड याच्याविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. पीडित महिला ही नैसर्गिक विधीसाठी गेली असता तिचा आरोपीने विनयभंग केला आणि तिला जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपी गायकवाडने पीडित महिलेस शारीरिक आणि मानसिक त्रास दिला तसेच शिवीगाळ करत मारहाण केली होती. या प्रकारास कंटाळून पीडित विधवेने गावातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
या प्रकरणाचा तपास फौजदार सी. टी. चौधरी यांनी केला आणि दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या तपासाअंती आरोपीने गुन्हा केल्याचे सिद्ध झाले. जिल्हा न्यायाधीश विशाल गायके यांनी आरोपी भगवान गायकवाड यास विविध कलमांतर्गत ४ वर्षे सक्तमजुरी आणि ९ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड. नीरज कोळनुरकर यांनी काम पाहिले.