नांदेड -उन्हामुळे जंगलातील पाणवठे आटले आहेत. परिणामी अन्न आणि पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी नागरी वस्तीमध्ये शिरकाव करत आहेत. अशीच एक घटना हिमायतनगर तालुक्यात घडली. गुरूवारी (28 मे) रात्री पाण्याच्या शोधात आलेल्या एका लांडग्याने शेतातील आखाड्यात कोंडलेल्या 50 कोंबड्याचा अंधाराचा फायदा घेत फडशा पाडला.
नांदेड जिल्ह्यात लांडग्याचा कुक्कुटपालनावर हल्ला, तब्बल 50 कोंबड्यांचा पाडला फडशा - लांडग्याचा हल्ला बातमी
हिमायतनगर तालुक्यात गुरूवारी (28 मे) रात्री पाण्याच्या शोधात आलेल्या एका लांडग्याने शेतातील आखाड्यावर कोंडलेल्या 50 कोंबड्याचा अंधाराचा फायदा घेत फडशा पाडला.
हिमायतनगर तालुक्यातील कारला शिवारात राजेश ढाणके यांचा शेतात आखाडा आहे. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी येथे कुक्कुट पालनाचा व्यवसाय सुरू केला होता. शेतातील कामे आटोपून ढाणके गुरुवारी सायंकाळी घरी परतले. दरम्यान, पाण्याच्या शोधात रानावनात फिरत असलेल्या लांडग्याला आखाड्यावर कोंडलेल्या कोंबड्यांचा सुगावा लागला. अंधाराचा फायदा घेत लांडग्याने तब्बल 50 कोंबड्यांचा फडशा पाडला. यात शेतकऱ्याचे मोठं नुकसान झाले आहे. वनविभागाने पंचनामा करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक करत आहेत.
उन्हाची तीव्रता वाढल्याने जंगलातील पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. तसेच पानगळतीमुळे अन्नाचीही वाणवा भासत आहे. अशावेळी मोर, ससे, वानर, कोल्हा, लांडगा या सारखे वन्यजीव नागरी वस्त्यांमध्ये शिरकाव करत आहेत. त्याचा फटका स्थानिकांना बसत आहे. यामुळे वनविभागाने जंगलात तात्पुरत्या स्वरुपाचे पाणवठे तयार करून वन्यजीवांना पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी होत आहे.