नांदेड - जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या 3 शेतकऱ्यांच्या कारभारणींनी दहावीची परीक्षा दिली. घरच्या कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यानंतर रडत बसण्यापेक्षा परिस्थितीशी दोन हाथ करण्यासाठी या तिघीही शिक्षण घेऊन मैदानात उतरणार आहेत. अर्धापूर तालुक्यातील धामदरी गावातील सुनीता कदम, मालेगाव इथल्या मंगला इंगोले आणि अर्धापूर इथल्या लक्ष्मी साखरे यांनी मंगळवारी दहावीचा पहिला पेपर सोडवला. बहिस्थ विद्यार्थी म्हणून या तिघींनी सतरा नंबरचा फॉर्म भरत ही परीक्षा दिली आहे.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी खचून जाऊ नये यासाठी पुण्यजागर प्रकल्पाने या महिलांना ही प्रेरणा दिली. त्यातून आयुष्याच्या नव्या परीक्षेला ह्या तिन्ही शेतकरी महिला सामोऱ्या गेल्या आहेत. शिक्षण अर्धवट सोडणाऱ्यासाठी सतरा नंबरचा फॉर्म भरून दहावीची परीक्षा देण्याची तरतूद आहे. गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीने ह्या तरतुदीचा फायदा घेत ही परीक्षा दिली. दहावीनंतर पुढेही शिक्षण घेत आपल्या कुटुंबाचे भविष्य घडवण्याचा निर्धार या महिलांनी केला आहे. त्यामुळे या महिलांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
घरच्या कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यावर त्या कुटूंबात आडचणींची मालिका सुरू होते. अशा अडचणींशी दोन हात करणारी अनेक शेतकरी कुटूंब अर्धापूर तालुक्यात आहेत. पुण्यातील भोई फाऊंडेशनने अर्धापूर तालुक्यात पुण्यजागर प्रकल्प सुरू केला असून त्याद्वारे शेतकरी कुटूंबातील पाल्यांना शैक्षणिक मदत करण्यात येत आहे. या माध्यमातून मुलांच्या शिक्षणासोबत त्यांच्या पालकांचेही शिक्षण व्हावे यासाठी पुढाकार घेतला. अर्धापूर तालुक्यातील धामदरी येथील सुनिता कदम, मालेगाव येथील मंगला इंगोले व अर्धापूर येथील लक्ष्मी साखरे यांनी बहिस्थ विद्यार्थी म्हणून दहावीच्या परिक्षेचा अर्धापूरमधून अर्ज भरला. त्यांनी अर्धापूर येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतील दहावी परिक्षा केंद्रातून मंगळवापरी परीक्षा दिली. त्यामुळे नवी उमेद नवी आशा निर्माण झाली आहे.
हेही वाचा -बारावीचा पेपर देवून परतणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू