नांदेड- राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यापूर्वीच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी दहा हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. राज्याचा अहवाल केंद्राकडे सादर केल्यानंतर केंद्र सरकारच्या वतीनेही जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आग्रह धरू, प्रतिपादन केंद्रीय ग्राहक संरक्षण व अन्न सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
अर्धापूर तालुक्यातील खैरगाव (बु.) येथील आनंद कल्याणकर या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वन केले. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले की, राज्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूससह मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात सर्व पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून नुकसान भरपाईच्या मागणीचा प्रस्तावही त्यांनी वरीष्ठ पातळीवर पाठवला आहे.