नांदेड- शहरातील वजीराबाद भागाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असून याकडे महापालिकेचे मात्र दुर्लक्ष होत आहे. वजीराबद येथील गेटसमोर गेल्या १० दिवसांपासून ही पाईपलाईन फुटली आहे. स्थानिक नागरिकांनी याची तक्रार देखील केली आहे. मात्र, गेल्या महापालिका अधिकारी किंवा कर्मचारी लक्ष द्यायला तयार नाहीत.
ऐन दुष्काळात १० दिवसांपासून पाईपलाईन फुटल्याने पाण्याची नासाडी - pipeline
शहरातील वजीराबाद भागाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असून याकडे महापालिकेचे मात्र दुर्लक्ष होत आहे.

एकीकडे विष्णूपुरी प्रकल्पाचा पाणीसाठा कमी होत असल्याने महापालिकेने शहराला २ दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे ठरवले आहे. मात्र, दुसरीकडे गेल्या १० दिवसांपासून पाईपलाईन फुटून अशाप्रकारे हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याची तक्रार देऊनही पाण्याच्या प्रश्नासंबंधी महापालिका गंभीर नसल्याचे दिसत आहे.
नांदेड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दर महिन्याला जवळपास ९ ते १० दलघमी पाणी लागते. सध्याची परिस्थिती लक्षात घेता मे अखेरपर्यंत पाणी पुरेल अशी परिस्थिती आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर असतानाही फुटलेल्या पाईप लाईनची गेल्या १० दिवसांपासून दुरुस्ती होत नाही. यामुळे पाणी प्रश्न अजून गंभीर होणार की काय? असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.