नांदेड- आसना नदीत सोडण्यात आलेले इसापूरच्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील पाणी सांगवी जवळील बंधाऱ्यात पोहोचले असून एक दलघमी इतका पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठी नांदेड उत्तर भागासाठी २५ दिवस पुरणार आहे. तर गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पात सध्या ३०.२३ टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो मे अखेरपर्यंत पुरण्याची शक्यता आहे. पाणीसाठ्याची परिस्थिती लक्षात घेऊन २ दिवसांऐवजी ३ दिवसांआड पाणीपुरवठा करण्याची शक्यता महापालिका प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
पाणीपुरवठा विभागाची आयुक्त लहुराज माळी यांनी याबाबात बैठक घेऊन आढावा घेतला. शहराला पाणीपुरवठा करणारी काळेश्वर येथे १, कोटीतीर्थ येथे ४ पंप, तर आसना नदीवर २ पंप आहेत. त्याबरोबर जलशुद्धीकरणाचे काबरानगर येथे दोन नवीन पंप हाऊस आहेत. डंकीन , सिडको आणि असवदन येथे प्रत्येकी एक पंप असून पाच प्रकल्प आहेत.