नांदेड - गेल्या दोन दिवसांत गोदावरी नदी परिसरात व विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. विष्णुपुरीच्या वरच्या बाजूला असणारे सिद्धेश्वर आणि येलदरी धरणही तुडूंब भरल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे. विष्णुपुरी धरणातून गोदावरी नदीपात्रात ४७१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
येलदरी-सिद्धेश्वर धरणं तुडूंब भरल्याने विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग - विष्णुपुरी धरण पाणीसाठा न्यूज
नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प म्हणून ओळखला जातो. या प्रकल्पाच्या वरच्या बाजूला असणारे सिद्धेश्वर आणि येलदरी धरणं तुडूंब भरल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे.
पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने मराठवाड्यात ११ ते १६ सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातील नांदेडसह परभणी, हिंगोली, औरंगाबाद परिसरात पाऊस झाला आहे. यावर्षी पर्जन्यमानाचे प्रमाण चांगले असल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. मराठवाड्यातील महत्त्वाचे समजले जाणारे जायकवाडी धरणातही ९५ टक्के जलसाठा असल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विष्णुपुरी प्रकल्पाच्यावरील भागात चांगला पाऊस झाला. तसेच सिद्धेश्वर, येलदरी धरण भरले असल्याने विष्णुपुरी धरणाचा नऊ क्रमांकाचा दरवाजा काल उघडण्यात आला. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने विष्णुपुरी धरण जुलै महिन्याच्या प्रारंभीच भरले होते. जुलै महिन्यात ७ ते ८ वेळा विष्णुपुरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर ऑगस्ट आणि आता सप्टेंबर महिन्यातही सतत पावसाची हजेरी असल्याने सतत विष्णुपुरी धरणाचे दरवाजे उघडावे लागत आहेत.