नांदेड - गेल्या चार महिन्यांपासून पाण्यासाठी तरसणाच्या नांदेडकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सिद्धेश्वर धरणातून नांदेडसाठी १५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले असून हे पाणी बुधवारी मध्यरात्री किंवा गुरुवारी सकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे.
यंदाचा उन्हाळा नांदेड शहरवासीयांसाठी पाण्याबाबत अतिशय त्रासदायक ठरला आहे. विशेषतः मेच्या पहिल्या आठवड्यापासून शहरातील पाणी टंचाईची झळ गल्लोगल्ली बसू लागली आहे. त्या परिस्थितीला मनपा यंत्रणेचा ढिसाळ व बेताल कारभार जबाबदार आहे. तहान लागली की विष्णुपुरी धरणाकडे किंवा युपीपी वा सिद्धेश्वर, डिग्रस बंधाऱयाच्या पाण्याकडे डोळे लावायची सवय मनपा यंत्रणेने जडवून घेतली आहे. परिणामी नांदेडकरांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली.
सिद्धेश्वर धरणाचे पाणी आज विष्णुपुरी प्रकल्पात येणार आहे. मनपाने पाणी कर भरुनही नियमित पाणी न देण्याचे पातक केले जात आहे. अशा परिस्थितीत विशेषतः दक्षिण नांदेडमधील राहिवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे सिद्धेश्वर धरणातून नांदेडसाठी पाणी सोडण्याची मागणी सत्ताधारी भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली होती. तसेच काँग्रेस आमदारांनीही ही मागणी मुंबईत पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीतही लावून धरली होती. त्यानुसार सिध्देश्वर धरणातून नांदेडसाठी १५ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले असून हे पाणी वाटेतील विविध नद्या पार करुन नांदेडला बुधवारी रात्री किंवा गुरुवारी सकाळपर्यंत विष्णुपुरी धरणात पोचण्याची शक्यता आहे.
सिध्देश्वर धरणातू प्रत्यक्षात १५ दलघमी पाणी सोडले असले तरी विष्णुपुरीपर्यंत केवळ २ किंवा ३ दलघमी पाणीच पोचणार असल्याची माहिती जलतज्ज्ञांनी दिली आहे. हे पाणी नांदेडमध्ये पोहचल्यानंतर किमान महिनाभराची पाणी समस्या सुटणार असल्याची माहिती एनआयडी उत्तरचे कार्यकारी अभियंता एन. पी. गव्हाणे व सहायक अधीक्षक अभियंता मुकुंद कहाळेकर यांनी दिली आहे. हे पाणी पोहोचल्यावर मनपातर्फे पाच किंवा मनमानी पध्दतीने होत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या गलथान व जाचक कारभारात नांदेडकरांची सुटका होण्याची शक्यता आहे.