महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'बा विठ्ठला मुख्यमंत्र्यांना बुद्धी दे' दगड फोडत वडार समाजाचे आंदोलन

मुख्यमंत्र्यानी वडार समाजाला एस. टी. प्रवर्गात आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. वडार समाजाच्या विकासासाठी १०० कोटी देणार होते. मात्र, या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही, असे म्हणत आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केले.

By

Published : Jul 12, 2019, 12:02 PM IST

आंदोलन

नांदेड- दगड फोडण्याचे कष्टाचे काम करून जीवनाचा गाडा हाकणाऱ्या वडार समाजाला न्याय कधी मिळणार, असा सवाल करत वडार समाजाने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी वडार समाजाने आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलाचा पेहराव परिधान करत देवासमोर दगड फोडत आणि टाळ वाजवत अनोखे आंदोलन केले.

दगड फोडत वडार समाजाचे आंदोलन

विठ्ठला मुख्यमंत्र्यांना बुद्धी दे', वडारांना आरक्षण दे, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. मुख्यंमत्री पंढरपूरात विठ्ठलाची पूजा करतात, मात्र, वडार समाजाला विठ्ठलाचा रथ ओढण्याचा मान साडेतीनशे वर्षांपासून आहे. पांडुरंगाची शपथ घेत वडार समाजाच्या समस्या सोडवण्याचे मुख्यंमत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही, असे आंदोलनकर्ते म्हणाले.

दळणवळणाचे, रस्ते, सिंचनाचे प्रकल्प उभारणाऱ्या आणि प्रशासनाच्या मोठमोठ्या इमारती बांधण्यास कष्ट करणारा वडार समाज अजूनही शासनाच्या योजनापासून वंचित आहे. मुख्यमंत्र्यानी वडार समाजाला एस. टी. प्रवर्गात आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. वडार समाजाच्या विकासासाठी १०० कोटी देणार होते. मात्र, या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही. हा वडार समाजावर अन्याय आहे, असे मत व्यक्त करत वडार समाजाकडून प्रतिकात्मकरित्या हातोड्याने दगड फोडत आणि टाळ वाजवून आंदोलन करण्यात आले.

शासनाने वडार समाजच्या शैक्षणिक आणि आर्थिक सुधारणा करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय वडार समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रावण रुपनवाड, शंकर म्हैसेवाड, बालाजी मानकरी, श्रीरंग पवार याच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details