नांदेड - जिल्हा परिषदेला प्रथमच मुख्य कार्यकारी अधिकारीपदी एक महिला अधिकारी लाभल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सनदी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित झाले आहेत. ठाकूर यांच्या नियुक्तीमुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सीईओ महिला असण्याचा अनोखा योगायोग जुळून आलेला असून यानिमित्ताने नांदेड जिल्हा परिषदेत महिलाराज पाहावयास मिळणार आहे.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांची 17 मार्च रोजी बदली झाल्यापासून हे पद रिक्त होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांच्याकडे या पदाचा तात्पुरता पदभार देण्यात आला होता. काकडे यांच्या बदलीनंतरच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनेक नावांची चर्चा होती, त्यामध्ये वर्षा ठाकूर आणि शिवानंद टाकसाळे यांची नावे आघाडीवर होती. राज्य सरकारने नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वर्षा ठाकूर यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.