नांदेड - जिल्ह्याला मान्सूनची प्रतिक्षा असताना अवकाळी पावसाने सिडको - हडकोसह इतर गावांना वादळासह जोरदार तडाखा दिला आहे. हा अवकाळी पाऊस शुक्रवारी रात्री सुमारे ११ वाजता आला होता. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. यावेळी घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. यात सुदैवाने कुठेही जीवितहानी झाली नाही.
संभाजी चौक , मोंढा प्रकल्प वसाहत , शाहुनगर , पठाण कॉलनी व कौठा भागात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने अचानक तडाखा दिला. यावेळी अनेकांच्या घरावरचे पत्रे उडली आहेत. तर रस्त्यावरची झाडे तुटल्याने काही रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली. वाऱ्यांच्या तडाख्याने परिसरातील विद्युत खांबे वाकली आहेत. तर अनेक ठिकाणी तारा तुटल्याने विद्युत प्रवाह बंद झाल्याने परिसरातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.
वादळी वाऱ्यासह पावसाने केलेले नुकसान सिडकोतील रस्ता दहा तासांसाठी झाला होता बंद-सिडकोतील वसंतराव नाईक ते लातूरफाटा मुख्य रस्त्यावर अनेक झाडे तुटून पडल्याने जवळपास दहा तास रस्ता बंद होता. मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने रस्त्यावरील झाडे हटविली आहेत. सिडको - हडको परिसरातील मुख्य रस्त्यावरील वसंतराव नाईक कॉलेज येथील झाडे तुटुन रस्त्यावर पडल्याने हा रस्ता रात्री बंद झाला होता. या रस्त्यावरील वाहतूकचालकांना दूधडेअरी मार्गाने घराकडे परतावे लागले.
शाहुनगर भागातील नागरिकांच्या घरांना वादळी पाऊस वाऱ्याचा तडाखा-
सुसाट वाऱ्यामुळे शाहुनगर भागातील अनेक घरावरचे पत्रे उडाली आहेत. पठाण कॉलनीत विद्युत खांबे वाकल्याने अनेक भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला.परिसरातील अनेकांच्या घरावचे पत्रे उडाल्याने त्यांचे संसारोपयोगी सामान उघड्यावर पडले. प्रकाश बाबुराव कुलकर्णी ,सुभाष भगवानराव देगावकर, चित्रा लोंढे आणि राजेश मदनलाल आहिर यांच्या घरांना वादळी पाऊस व वाऱ्याचा तडाखा बसला. या पावसामुळे सिडकोच्या काही भागातील एन डी ४१ के १ भागातील काही घरात पावसाचे पाणी गेल्याने नागरिकांची मोठी ताराबंळ उडाली होती.
मोढा परिसरातील घरांवरील पत्रे उडाली-
मोढा परिसरातील पांडुरंग चंदनकर यांच्या घरावरचे पत्रे उडाल्याने त्यांना रात्र दुसऱ्याकडे काढावी लागली. मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख रईस पाशा व उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यांनी नुकसानीची माहिती घेतली. त्याबाबतची माहिती मनपाचे क्षेत्रीय अधिकारी रावण सोनसळे, कार्यालय अधीक्षक विलास गजभारे व स्वछता निरीक्षक रुपेश सरोदे यांना देण्यात आली. त्यानंतर मुख्य रस्त्यावरील झाडे हटविल्यानंतर रस्ता वाहतुकीस मोकळा झाला. सखल परिसरातील इतर भागात अवकाळी पावसाचे पाणी घरात गेल्याचेही चित्र दिसून आले.
नुकसानीचा अहवाल नांदेड तहसिलदार यांच्याकडे पाठविण्यात आला-
सिडको - हडको , संभाजी चौक ,शाहुनगर, लिंबोनीनगर ,मिरानगर , वाघाळा , पठाण कॉलनी , गुंडेगाव , बाबुळगाव आदी भागातील नागरिकांच्या घरांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. मंडळ अधिकारी दिपक देशमुख व वाघाळा तलाठी राहुल चव्हाण यांनी नुकसानीची पाहणी केली. त्याबाबतचा प्राथमिक आवाहल नांदेड तहसिलदार यांच्याकडे पाठविण्यात आला आहे . परिसरात अंधार असल्याने ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे व पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्त अनेक भागात ठेवली होती.