नांदेड :नांदेडमध्ये बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. भाजीपाल्यासह पपई आणि कलिंगडाच्या बागेला गारपिटीचा मोठा तडाखा बसला आहे. पपई आणि कलिंगडाच्या फळाला गारांचा मार लागल्याने दोन्ही फळबागा नष्ठ झाल्या आहेत. त्यामुळे हाताशी आलेल्या या दोन्ही फळबागांवर शेतकऱ्यांनी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
बळीराजाला पावसाचा तडाखा : मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात पाच तालुक्यांमध्ये गारपीट झाली आहे. या गारपिटीत नगदी पीक असलेल्या डाळिंब, केळी आणि पपईच्या बागा जमिनदोस्त झाल्या. बागांमध्ये गारांचा खच साचला होता तर, सोसाट्याच्या वाऱ्याने पपईचे पीक आडवे झाले आहे. आठवड्यात दुसऱ्यांदा बळीराजाला पावसाचा तडाखा सहन करावा लागला आहे. सध्या उन्हाळ्याला सुरुवात झाली असली तरी पावसाचे थैमान सुरूच आहे.
गारपिटीने पिकांचे नुकसान :सकाळपासून कडक ऊन पडले होते. मात्र, अचानक वातावरणात बदल झाला आणि आभाळ दाटून आले. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. काही वेळातच मुसळधार पाऊस झाला. यात अनेक ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला. या गारपिटीने पिकांचे मात्र अतोनात व नुकसान झाले आहे. सध्या रबी हंगाम आटोपत आला आहे. शेतात काही पिके शिल्लक आहेत. मात्र, गारपिटीने बागायती पिकांना जबर फटका बसला आहे.