नांदेड - गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणुका बिनविरोध करत ग्रामपंचायतीने एक आदर्श ठेवला आहे. कंधार तालुक्यातील भोजुची वाडी या ग्रामपंचायतीने निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील तरुण सतीश देवकते यांच्याकडे ग्रामपंचायतीची सर्व सूत्रे दिली आहेत.
खालच्या स्तराच्या राजकारणाला फाटा
निवडणुका म्हटले, की राजकीय पक्ष, गट-तट यासोबतच राजकारणदेखील आले. निवडणुकीच्या काळात सत्ता मिळवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद यासर्वांचा वापर केला जातो. यामुळे अनेक चांगल्या कार्यकर्त्याला सत्तेपासून दूर राहावे लागते. मात्र खालच्या स्तराचे राजकारण टाळत ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध केल्यातर गावाचा विकास होतो. हाच संकल्प करत कंधार तालुक्यातील भोजूचीवाडी येथील ग्रामस्थांनी निवडणुका न घेण्याचे ठरवले आहे.
३५ वर्षांपासून बिनविरोध ग्रामपंचायत
भोजूचीवाडी या ग्रामपंचायतीत मागील ३५ वर्षांपासून निवडणुका झाल्या नाहीत. प्रत्येक वेळी गावकरी एकत्र येत सदस्य आणि सरपंच निवडतात. ग्रामपंचायत निवडणूक २०२१देखील बिनविरोध करण्याचा संकल्प केला आहे. १९८५पासून बिनविरोध निवडणुका घेण्याची परंपरा या गावात सुरू झाली आहे.