नांदेड - निवडणुकीवरून होणारे वाद-विवाद गावा-गावात पहायला मिळतात. गाव लहान असो वा मोठे उमेदवारी आणि पदावरून रस्सीखेच पाहायला मिळतेच. पण अर्धापूर तालुक्यातील अमराबाद या गावात तब्बल 41 वर्षांपासून ग्रामपंचायत बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम आहे. आजपर्यंत येथे ग्रामपंचायत निवडणूकच झालीच नाही. गावातील याच एकीमुळे गावासह शिवारापर्यंत विकास पोहोचला आहे.
जशी शेती फुलवली, तशी गावात एकीही ठेवली-
दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकाराने या भागात इसापूर प्रकल्पाने जणू हरीत क्रांती केली. जिल्ह्यातील अमराबाद हिरवाईने नटलेले आहे. गावात ऊस, केळी व हळदीचे मुख्य पीक आहे. जशी शेती फुलवली तशी गावात एकी ठेवून गावाची किर्तीही ग्रामस्थांनी वाढविली आहे. सातशे आठशे लोकसंख्या असलेल्या या गावातील गावकऱ्यांनी 41 वर्षापासून एकाच व्यक्तीला बिनविरोध निवडून देऊन एक चांगला पायंडा पाडला आहे. ग्रामपंचायतीसह सेवा सहकारी संस्थेची निवडणूकदेखील बिनविरोध केली जाते. यंदाही ही परंपरा राखत ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शामराव पाटील टेकाळे यांची निवड करण्यात आली आहे.
'या' गावात तब्बल 41 वर्षापासून झाली नाही ग्रामपंचायत निवडणूक! - काँग्रेस नेतृत्वातील बिनविरोध ग्रामपंचायत
सातशे आठशे लोकसंख्या असलेल्या या गावातील गावकऱ्यांनी 41 वर्षापासून एकाच व्यक्तीला बिनविरोध निवडून देऊन एक चांगला पायंडा पाडला आहे. ग्रामपंचायतीसह सेवा सहकारी संस्थेची निवडणूकदेखील बिनविरोध केली जाते. यंदाही ही परंपरा राखत ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शामराव पाटील टेकाळे यांची निवड करण्यात आली आहे.
अमराबाद ग्रामपंचायतीमध्ये सात सदस्य आहेत. गावातील लोक एकत्र येऊन उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करतात. श्यामराव पाटील यांची सरपंच किंवा उपसरपंचपदी सातत्याने निवड होत असते. यंदाही सर्वांच्या सहकार्यातून शामराव यादोजी पाटील टेकाळे यांची सरपंच पदी सहाव्यांदा निवड करण्यात आली, तर सरस्वतीबाई गुणाजी मुकदम यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली. बिनविरोध निवडणूक होण्यासाठी व्यंकटराव कल्याणकर, हरिचंद्र टेकाळे, बाबूराव टेकाळे, मारोतराव पांचाळ, पांडुरंग मुकदम, साहेबराव ढाले, गंगाधर टेकाळे यांनी येथील ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यासाठी नेहमी प्रमाणे सहकार्य केले.
गावासह शिवारातही रस्ते मजबूत !
गावातील रस्त्याच्या मजबुतीकरणासह शिवाराचेही मजबुतीकरण करून तब्बल पाच हजारच्या वर झाडांची लागवड केली आहे. सदरील कामे करताना कामाच्या दर्जाबाबत काळजी घेतली जाते. प्रसंगी स्वतःचे पैसेही खर्च करतात. शासनाने दिलेल्या अंदाजपत्रकाप्रमाणे कामे करून तीस वर्षे झाले तरीही रस्ते अजूनही मजबूत आहेत. तसेच शिवारापर्यंत मजबूत रस्ते असल्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा वाहतुकीचा खर्च वाचतो.
स्वच्छतेची विशेष काळजी व रस्त्याच्या दुतर्फा चार हजारच्यांवर झाडांची लागवड!
या गावात स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते. गाव स्वच्छ राहील यासाठी सरपंच पाटील स्वतः सूचना करतात. तसेच गावातील शिव-पाणंद रस्त्यावर जवळपास चार हजारांच्यावर झाडे लावण्यात आली आहेत. त्यातच गावातील तरुणही गणेशोत्सव आणि शिवजन्मोत्सवाच्या अनुषंगाने झाडांची लागवड करतात. त्यामुळे शिवारासह गावही हिरवाईने नटले आहे. गावातील ग्रामपंचायत इमारत, शाळा, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते यासह विविध विकासकामे पूर्ण झाली असून यंदा 'स्वच्छ गाव-सुंदर गाव' मध्ये सहभाग घेतला आहे.
गावातील तंटे गावातच मिटतात-
सरपंच श्यामराव पाटील टेकाळे यांनी आजपर्यंत गावातील जे काही किरकोळ वाद असतील ते गावातच मिटवले. आजपर्यंत पोलीस ठाण्यामध्ये कुठेही नोंद झालेली नाही. त्यामुळे गावात कायम शांतता असते. या तंटामुक्त गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात.
चव्हाण घराण्याशी एकनिष्ठ-
माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत नेते शंकरराव चव्हाण आणि त्यांचे सुपूत्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या घराण्याविषयी एकनिष्ठ असलेले हे गाव आहे. लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विरोधी पक्षाला अत्यल्प मत मिळते. तर काँगेसला मात्र मोठे मताधिक्य नेहमीच असते. पक्षाची एकनिष्ठता लक्ष्यात घेऊन ना.चव्हाण यांनी श्यामराव पाटील यांची नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी व रोजगार हमी योजनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
..त्या दिवशी माझी सेवा सन्मानाने थांबवेल- श्यामराव पाटील-टेकाळे
गेल्या 41 वर्षांपासून गावकऱ्यांनी मला सेवेची संधी दिली आहे. त्यांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. गावातील सर्व गावकऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळते यामुळे येथील ग्रामपंचायत बिनविरोध निवड होते. आणि ज्या दिवशी मला गावातील एकाही व्यक्तीने सेवा थांबविण्याची मागणी केली किंवा विरोध केला, त्या दिवसापासून माझी सेवा थांबवू, अशी प्रतिक्रिया शामराव पाटील टेकाळे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.