नांदेड- जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्हा बँकेत येऊन मंत्री अशोक चव्हाण यांनी वसंतराव चव्हाण यांच्याकडे ही सूत्रे सोपवली आहेत. वसंतराव चव्हाण हे आतापर्यंत तीन वेळा आमदार राहिलेले तगडे नेते म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात. ग्रामीण मातीशी नाळ असलेले नेते म्हणून वसंतराव चव्हाण परिचित आहेत. अध्यक्ष पदाच्या रूपाने नांदेडच्या बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वसंतराव चव्हाण तर उपाध्यक्षपदी भोसीकरांची बिनविरोध निवड - Hariharrao Bhosikar, NCP
नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे वसंतराव चव्हाण तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे भोसीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यात सेनेचा १ संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर काँग्रेसचे १२ संचालक आहेत.
उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे भोसीकर
अपेक्षेप्रमाणे बँकेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या हरिहरराव भोसीकर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. दोन्ही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या पदाचा पदभार घेत कामाला सुरुवात केली आहे.
जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनाच्या महाविकास आघाडीने १७ जागांवर विजय संपादन करुन स्पष्ट बहुमत मिळविले आहे. यात सेनेचा १ संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर काँग्रेसचे १२ संचालक आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्याने बँकेचे अध्यक्षपद त्यांच्या वाट्यास तर दुसऱ्या क्रमांकाचे संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्यास बँकचे उपाध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला.
पालकमंत्र्यांकडून दोघांना हिरवा झेंडा
पालकमंत्री चव्हाण हे या निवडीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारीच नांदेड शहरात दाखल झाले होते. आयटीएम येथे सायंकाळी निवडी बाबत महाविकास आघाडीच्या नेते मंडळीत खलबत्ते झाली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी पालकमंत्री चव्हाण यांनी बँकेच्या अध्यक्षपदासाठी माजी आ. वसंतराव चव्हाण तर उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या नावास पसंती दर्शविली होती. विधान परिषदेचे प्रतोद अमरनाथ राजुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी दुपारी आपले नामनिर्देशनपत्र अध्यासी अधिकारी यांच्याकडे दाखल केले होते. एकमेव अर्ज आल्याने जिल्हा बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदी अनुक्रमे माजी आ. चव्हाण व भोसीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुक प्रक्रियेदरम्यान भाजपाचे चारही संचालक अनुपस्थित होते.
'जिल्हा बँकेला राज्य सरकारचे सहकार्य राहिल'
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आ. वसंतराव चव्हाण व उपाध्यक्षपदी हरिहरराव भोसीकर यांची निवड झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे दुपारी जिल्हा बँकेत आगमन झाले. महाविकास आघाडीच्या संचालकांशी संवाद साधतांना त्यांनी बँक चांगली चालली पाहीजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर बँकेला राज्य सरकारचे वेळोवेळी सहकार्य राहिल, असे आश्वासनही दिले आहे.