नांदेड - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. अतिवृष्टीपूर्वी पावसाने पाठ फिरविल्यामुळे ज्वारीच्या मुळांना उन्नी अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर पावसामुळे ज्वारीच्या कणसालाही अळ्या लागल्यामुळे कणसात दाणे भरले नाहीत. अशा परिस्थितीत सुरू असलेल्या पावसामुळे ज्वारीची पिके उन्मळून पडत आहेत. या दुहेरी संकटामुळे शेतकऱ्यांना वैरणासह धान्याच्या उत्पादनाला मुकावे लागणार आहे.
नांदेडमध्ये खरीप ज्वारीवर उन्नी अळीचे संकट - unni larvae crisis
नांदेडमध्ये खरीप ज्वारीवर उन्नी अळीचे संकट आले आले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या धान्याच्या संकटासह वैरण ही वाया गेले आहे.
यंदाच्या वर्षी जिल्ह्यात जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या वेळेवर घेतल्या. मात्र, त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने काही काळ ओढ दिली होती. काही भागात 15 ते 20 दिवसांपर्यंत पावसाने हुलकावणी दिली त्यामुळे ज्वारी, हळद, कापूस, तूर आदी पिकांना उन्नी अळीचा प्रादुर्भाव झाला. लोहा तालुक्यातील कापसी महसूल मंडळात येणाऱ्या उमरा, धनज, वाका, कापसी, जोमेगाव, आदी. गावांत हा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. असाच प्रकार जिल्ह्यातही इतर तालुक्यात झाला आहे. प्रारंभी ज्वारीच्या कणसावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कणसात दाणे भरले नव्हते. अशा परिस्थितीत जनावरांसाठी तर कडबा होईल, असे वाटत असताना ज्वारीच्या मुळांना उनीचा प्रादुर्भाव झाला. हा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आला नाही.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्वारीची पिके आता उन्मळून पडत आहेत. शेतात साचलेल्या पाण्यामुळे ती सडत असल्याने शेतकऱ्यांना धान्यासह वैरणालाही मुकावे लागणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता याबाबत संबंधित शासकीय यंत्रणांनी पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.