नांदेड -नांदेड जिल्ह्यातील माळाकोळी (ता.लोहा) परिसरात सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास जोरदार पावसात वीज पडून दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. संगाबाई तात्याराव केंद्रे (५५) व पांडुरंग कंधारे (६०) असे मृतांची नावे आहेत (Two killed by lightning in Nanded district ).
चार दिवसांपासून पाऊस सुरू -नांदेड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सोमवारी दुपारी लोह्यासह माळाकोळी परिसराला पावसाने झोडपून काढले. चारच्या सुमारास मौजे नागदरवाडी येथील महिला शेतकरी संगाबाई तात्याराव केंद्रे या शेतात काम करीत होत्या. त्याचवेळी विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. काही कळायच्या आत संगाबाई यांच्या अंगावर वीज कोसळली. यात त्यांचा मृत्यू झाला तर नागदरवाडी येथून काही अंतरावर असलेल्या रमणेवाडी येथे पांडुरंग कंधारे यांच्यावर वीज कोसळली. यात त्यांचाही मृत्यू झाला.
शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यानंतर रविवारी दिवसभरापासून सोमवारी दुपारपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. परतीच्या अतिपावसामुळे शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बिलोली व निझामाबादकडे जाणा-या मांजरा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक सेवा धर्माबादमार्गे वळविण्यात आली आहे. जिल्हयातील नदी, नाल्याना पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नांदेड शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यातच पाऊस पडत असल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. सखल भागात पाणी साचले आहे.
किनवटमध्ये नाल्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू -किनवट तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी मल्हारी महिपती मेंढे (४२) हे रविवारी (दि.११) रात्री गावातून जेवण करून शेतावर जागरण करण्यासाठी निघाले होते. रस्त्यात असलेला नाला ओलांडून जात असताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात वाहून गेले (1 person swept away in a stream in Kinwat taluka). दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. १२) सकाळी गावाजवळील काट्याकुट्यात अडकलेला त्यांचा मृतदेहच सापडला. पोलीस जमादार बाळासाहेव पांढरे यांनी घटनेचा पंचनामा करून आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. या मृत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. कर्ता पुरुष गेल्यामुळे हे कुटुंब उघड्यावर आले आहे.
जिल्ह्यात गत २४ तासात सरासरी ३८.७० मि.मी. पाऊस -जिल्ह्यात सोमवारी (दि.१२) सकाळी ८ वा. संपलेल्या गत २४ तासात सरासरी ३८.७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात एकुण ९८३.५० मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस नांदेड- २४ (९५६.६०), बिलोली-३३.८० (९६९.३०), मुखेड- १४.८० (८७८.४०), कंधार-७.४० (८५६.१०), लोहा-१२.२० (८७४.७०), हदगाव-२५.७० (८७४.३०), भोकर-४४.८० (१०७१.८०), देगलूर-२०.३०(८२१.२०), किनवट-११७.८० (१२२८.४०), मुदखेड- २४ (११०८.८०), हिमायतनगर-८०.९० (१२५२.५०), माहूर- ९१.१० (१०५१.७०), धर्माबाद- ५०.९० (१२०१.६०), उमरी- २७.५०(११३५.४०), अर्धापूर- २७.६० (८९०.८०), नायगाव-२९ (८७१.००) मिलीमीटर आहे.