नांदेड -मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी मेघगर्जनेसह हजेरी लावली. नांदेड, किनवट, धर्माबाद, बिलोलीत हलक्या सरी तर, उमरी, मुदखेड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. दरम्यान, वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये मुदखेड तालुक्यातील मुगट येथील शेतकरी दत्ता ढेपाळे (55) यांचा तर किनवट तालुक्यातील शिवणी येथे शेतकरी गंगाधर अभया येवलवाड (55) यांचा समावेश आहे. तर याबरोबरच धर्माबाद शहरापासून काही अंतरावर असलेल्या बाळापूर शिवारात सायंकाळी पाचच्या सुमारास रमेश सुर्यकार यांच्या शेतातील बैल जोडीवर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला.
आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकर्यांसह उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. नांदेड शहरात मागील काही दिवसांपासून उन्हाचे चटके वाढल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले. दरम्यान, बुधवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. किनवट, धर्माबाद, बिलोली, लोहा या तालुक्यात शिडकावा झाला असून ढगाळ वातावरण तयार झाले होते. तर, मुदखेड, उमरी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. उर्वरित तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून रात्री उशिरा पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
हेही वाचा -कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होणार