महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक; विजेची तार ट्रॅक्टरवर पडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू - ट्रॅक्टर

शेतात ट्रॅक्टरने मशागत करताना विजेची तार अंगावर पडून दोन भावांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे भेंडेगावावर शोककळा पसरली आहे.

मृत भाऊ

By

Published : Jul 2, 2019, 11:12 PM IST

नांदेड- ट्रॅक्टरने शेतीच्या मशागतीचे काम करताना लोंबकळत असलेला विजेची तार ट्रॅक्टरवर पडल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना भेंडेगाव बु. येथे सकाळी आठच्या दरम्यान घडली. रमेश सदाशिव पाटील आणि मंगेश सदाशिव पाटील असे विजेच्या धक्क्याने ठार झालेल्या भावांची नावे आहेत.


रमेश व मंगेश हे शेतात ट्रॅक्टरद्वारे मशागतीचे काम करत होते. त्यांच्या शेतात अनेक दिवसापासून विद्युत पोलवरील तार लोंबकळत होता. तो दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी अनेक महिन्यापासून केली होती. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. आज सकाळी आठ वाजता ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत करताना या विद्युत तारा ट्रॅक्टरवर पडल्या. या तारेला मंगेश पाटीलचा स्पर्श झाल्याने तो तेथेच चिकटला. त्याचा भाऊ रमेश पाटीलच्या ते लक्षात येताच हातात काठी घेवून विद्युत तार बाजूला करण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र तार निसटल्याने ती तार रमेशच्या अंगावर पडली. त्यामुळे मंगेश व रमेश यांचा जागीच मृत्यू झाला.


ही घटना समजताच गावातील सरपंच लालबा कांबळे व इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांनी विद्युत प्रवाह बंद केला. त्यानंतर या दोघांचेही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. मंगेशचे गेल्या वर्षीच लग्न झाले होते. रमेशला पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई असा परिवार आहे. या घटनेमुळे भेंडेगाव गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान विद्युत तारेच्या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही वीज मंडळाने दुर्लक्ष केल्यामुळेच या दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details